बहुचर्चित चर्चगेट-डहाणू उपनगरी गाडी सुरू करण्यात होत असलेल्या दिरंगाईच्या निषेधार्थ सोमवारी भाजपने पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयापुढे निदर्शने केली. यावेळी माजी रेल्वे राज्यमंत्री राम नाईक यांच्यासह अनेक भाजप कार्यकर्त्यांना अटक करून सोडून देण्यात आले. डहाणू गाडी सुरू झाली नाही तर भाजप उग्र आंदोलन पुकारेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.
चर्चगेट-डहाणू उपनगरी गाडी सुरू करण्याची घोषणा राम नाईक यांनी केली होती. मात्र ही गाडी सुरू करण्याबाबत पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून वारंवार वेगवेगळी कारणे देण्यात येत आहेत. याचा निषेध म्हणून चर्चगेट येथे सोमवारी दुपारी एक वाजता भाजप कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. यावेळी बोलताना राम नाईक यांनी, रेल्वेमंत्र्यांच्या हलगर्जीपणामुळे या गाडीला मुहूर्त मिळत नसून डहाणू गाडी सुरू न झाल्यास भाजप कार्यकर्ते उग्र आंदोलन करतील, असा इशारा दिला. मार्च महिन्याच्या अखेरीस गाडी सुरू होणार असे आश्वासन पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक महेशकुमार यांनी दिले होते. तथापि, त्यांनी ते आश्वासन पाळलेले नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले. या आंदोलनामध्ये भाजप आमदार आणि ज्येष्ठ कार्यकर्ते मोठय़ा प्रमाणात सहभागी झाले होते.

Story img Loader