आगामी लोकसभा निवडणुकीचे वेध घेत सर्वच पक्षांमध्ये खलबते वेगात सुरू होण्याच्या पाश्र्वभूमीवर भारतीय जनता पक्ष मात्र काँग्रेसच्या उमेदवारीवर लक्ष ठेवून निर्णय घेण्याच्या मानसिकतेत असल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघातून भाजपतर्फे विजय मुडे व सुरेश वाघमारे हे खासदार होऊन चुकल्याने गांधीवादी वर्धा जिल्हा भाजपला आपला गढ वाटतो, पण या गढाच्या किल्ल्या या वेळी कोणाकडे सोपवायच्या, याबाबत पक्षात कमालीची संदिग्धता दिसून येते. सर्वात अग्रक्रमावर माजी आमदार रामदास तडस यांचे नाव येते, मात्र गुरुवर्य दत्ता मेघेंना अपशकुन करण्याची त्यांची अजिबात मानसिकता नाही. पक्षनेते नितीन गडकरी यांनी एकहाती वध्र्याची उमेदवारी तडसांना देण्याची मानसिकता ठेवल्यावर मेघे पितापुत्र विरोधात मला भांडायला लावू नका, असा पवित्रा तडसांनी घेतल्याचे समजते. आडवळणावरच्या गावातील सामान्य कुटुंबातील तडसांना रंकाचा राव केल्याची कृतज्ञता तडस कुटुंबात आहे. त्यामुळेच ते कच खात असल्याचे भाजप नेते बोलतात.
वध्र्यातून काँग्रेसतर्फे सागर मेघे किंवा चारुलता टोकस या उमेदवार राहतील. मेघे नसल्यास व टोकस आल्यास तडस एका पायावर तयारी दर्शवतील, हे लपून नाही. त्यामुळेच काँॅग्रेसला डोळ्यापुढे ठेवून उमेदवारी ठरविण्याच्या मानसिकतेवर भाजपचा पदाधिकारी नाराज असल्याचे दिसून येते. काँग्रेसच्या कुणबी उमेदवारीच्या पाश्र्वभूमीवर भाजप तेली समाजाचा उमेदवार देणार, हे निश्चित झाले आहे. तडस नाही तर कोण, हा प्रश्न पुढे येतोच. माजी खासदार सुरेश वाघमारे लंगोट कसून आहेत, पण त्यांच्या या ऊर्मीला पक्षातून तीव्र विरोध होतो. पक्षाला काही देण्याची मानसिकता कधीच न ठेवणाऱ्या व पक्षश्रेष्ठींकडे सदैव व्यक्तिगत मागण्यांची यादी ठेवणाऱ्या वाघमारेंचा केवळ जात फॅक्टर पाहून उमेदवारीचा विचार करू नये, असा वाघमारे विरोधकांचा घोषा आहे.
काँग्रेसमधून आलेले व जिल्हा परिषदेच्या राजकारणातील मुरब्बी मिलिंद भेंडे यांचेही नाव अलीकडच्या काळात पुढे आले आहे. स्वबळावर मेळावे व अन्य उपक्रम घेऊन अल्पावधीत श्रेष्ठींवर छाप पाडणारे युवा नेते म्हणून त्यांच्याकडे पक्षनेते पाहतात. माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांचा स्नेह राखून असणाऱ्या भेंडेंना नवा चेहरा व मेघेंशी फ टकून राहणारा नेता म्हणून उमेदवारी मिळावी, असाही एक कल आहे. त्यांच्या राजकीय उंचीचा मुद्दा मांडणाऱ्या नेत्यांना वाघमारे प्रथम लढले तेव्हा उंचीचा  प्रश्न नव्हता काय, असा निरुत्तर करणारा सवाल भेंडे समर्थक टाकतात. याखेरीज दोन आश्चर्यकारक नावे पुढे आली आहेत. भाजपचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे व कृष्णा खोपडे यांचाही विचार सामाजिक पैलूने वध्र्यासाठी करण्यात आला, पण त्यांनी लोकसभेचा आखाडा नाकारला. मेघेंची भीती हे अज्ञात व खरे कारण ठरले. त्याहून आश्चर्यकारक नाव माजी आमदार सुबोध मोहिते यांचे पुढे आले. वध्र्यातून उमेदवारी मिळाल्यास भाजपतर्फे आपण लढू व मेघेंना सर्व बाबतीत पुरून उरणार, असा दावा त्यांच्यावतीने करण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. विशेष म्हणजे मोहिते यांना नुकतेच काँग्रेसचे जिल्हा निरीक्षक नेमण्यात आले आहे.
मेघे या एका नावामुळे भाजपमध्ये सध्या गोंधळाचे वातावरण आहे. टोकस असल्यास उमेदवारीसाठी भाजपमध्ये उडय़ांवर उडय़ा पडतील. अशा वेळी खुद्द नितीन गडकरी हे सुद्धा वेळेवरचे उमेदवार ठरू शकण्याची शक्यता वर्तविली जाते. पूर्ती साखर कारखान्याच्या माध्यमातून ग्रामीण भागात भाजपचे कट्टर समर्थक सध्या चाचपणी करीत आहेत. तेली समाजाचा उमेदवार द्यायचा, हे जवळपास पक्के झाले असल्याने पक्षातील इतर नेत्यांचे सूर गळ्यातच विरले आहेत. त्यांची नाराजी थोपविण्याचे आव्हान आहेच. भाजपला अलीकडच्या काळात सुगीचे दिवस दाखविणाऱ्या पदाधिकाऱ्यांना तसेच कट्टर कार्यकर्त्यांना मात्र उमेदवारीचा घोळ तिळमात्र पचनी पडला नसल्याचे दिसून येते. उमेदवारी संदर्भात या आठवडय़ात होणाऱ्या बैठकीत नितीन गडकरी व प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फ डणवीस यांच्यापुढे कार्यकर्त्यांची  अस्वस्थता प्रकट होण्याची चिन्हे आहेत.