राष्ट्रीय महामार्गावरील उमराणे येथे भूयारी मार्गाच्या रखडलेल्या कामामुळे अपघातांची मालिका सुरू झाल्याची तक्रार करत हे काम तातडीने सुरू न झाल्यास एक जानेवारीपासून उपोषण करण्याचा इशारा भारतीय जनता युवा मोर्चातर्फे देण्यात आला आहे.
धुळे ते पिंपळगाव हद्दीपर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम आठ वर्षांपूर्वी सुरू झाले. त्यावेळी कांदा बाजाराचे एक प्रमुख केंद्र म्हणून उदयास आलेल्या उमराणे गावाजवळ वाहतुकीची कोंडी व वर्दळ हा घटक लक्षात घेता तिसगाव रस्त्याला जोडून उड्डाणपूल व्हावा अशी मागणी करण्यात आली होती. मात्र या मागणीकडे संबंधित कंपनी व रस्ते विकास प्राधिकरणाने दुर्लक्ष करत तेथे भूयारी मार्ग प्रस्तावित केला. त्यानुसार हे काम करण्यात आले. परंतु ते सदोष असल्याने त्याचा वापर न करण्याकडे लोकांचा कल राहिला. त्यामुळे स्थानिकांना मुख्य रस्त्याचाच आसरा घ्यावा लागत असून ही बाब सुरक्षेच्या दृष्टिने अत्यंत घातक बनली आहे. अपघातांमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला असून अनेकांच्या नशिबी अपंगत्व आले आहे. सदोष भूयारी मार्ग केवळ शोभेची बाब बनल्याची वस्तूस्थिती व अपघातांच्या वाढत्या प्रमाणामुळे स्थानिकांना अनेकदा आंदोलन करावे लागले. त्याची दखल घेत राष्ट्रीय रस्ते विकास प्रधिकरणाने या भूयारी मार्गाची दुरूस्ती व उंची वाढविण्यासाठी तीन कोटी ९० लाखाची तरतूद केली होती. .त्यानुसार हे काम हाती घेण्यात आले. परंतु गेल्या काही दिवसांपासून हे काम पुन्हा बंद पडले असून ते कधी सुरू होईल याविषयी संभ्रम कायम आहे. निष्पाप लोकांचा अपघातांमध्ये बळी जात असल्याने हे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी भारतीय जनता युवा मोर्चातर्फे करण्यात आली आहे. ३१ डिसेंबपर्यंत हे काम सुरू न झाल्यास उपोषण करण्यात येईल असा इशारा मोर्चाचे देवळा तालुका उपाध्यक्ष किरण देवरे यांनी दिला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा