सोशल मिडियावर ट्विटरच्या माध्यमातून ‘टिवटिव’ करणारा, फेसबुकच्या माध्यमातून ‘कॉमेंट आणि लाईक’ करणारा, व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून ‘मॅसेज’ची देवाणघेवाण करणारा आणि ईमेलच्या माध्यमातून ‘पत्रव्यवहार’ करणाऱ्यांमध्ये युवा पिढीचा मोठा सहभाग आहे. हाच युवा वर्ग मतदार असल्याने लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मिडियाचा मोठय़ा प्रमाणात वापर केला. त्याचा परिणामही दिसून आला. आता भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार देवेंद्र फडणवीस त्याच मार्गावर असून, त्यांची ‘आयटी-वॉररूम’ सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.
प्रदेशाध्यक्षपदाची मोठी जबाबदारी असल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्यावर स्वत:च्या प्रचारासोबतच राज्यातील २८८ मतदारसंघांची धुरा आहे. प्रचारासाठी अवघ्या तीन आठवडय़ांचा कालावधी हातात असल्यामुळे फडणवीसांनी मोदींप्रमाणेच सोशल मिडियाचा आधार घेतला आहे. विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या इतर उमेदवारांपैकी फडणवीस सोशल मिडियाच्या वापरात आघाडीवर आहेत. त्यांची अलिकडेच उद्घाटित झालेली ‘आयटी-वाररूम’ आबालवृद्धांपर्यंत चर्चेचा विषय ठरली आहे. २४ बाय ७ चालणाऱ्या ‘आयटी-वाररूम’ मधून सोशल मिडियाच्या माध्यमातून प्रचाराची धुरा सांभाळली जात आहे. ३ लाख ३५ हजार मतदारांपैकी सुमारे अडीच लाख मतदारांपर्यंत ‘आयटी-वाररूम’च्या माध्यमातून पोहोचण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. फडणवीसांची फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅप, ईमेलचा संपूर्ण व्यवहार येथूनच हाताळला जात आहे. या सर्व माध्यमातून मतदारांना आव्हान केले जात आहे.
सोशल मिडियाच्या माध्यमातूनच सुमारे दीड लाख मतदारांचा संपर्क क्रमांक ही ‘आयटी-वाररूम’ हाताळणाऱ्या त्यांच्या चमूने मिळवला आहे. त्या प्रत्येकाच्या भ्रमणध्वनीवर ‘नमस्कार! मी देवेंद्र फडणवीस बोलतोय’ असे म्हणून मतदारांना भाजपाला मतदानासाठी आणि निवडून देण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. ट्विटरवर त्यांना जुळणाऱ्यांची संख्या वाढतच असून, फेसबुकवरील त्यांच्या विविध भिंतीवर ‘लाईक आणि कॉमेंट’ करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. महाराष्ट्रात त्यांच्या कोणत्याही ठिकाणी असलेल्या प्रचार सभा व कार्यक्रम आटोपल्याबरोबर अवघ्या काही मिनिटात सोशल मिडियावर छायाचित्रांसह त्या कार्यक्रमाची वित्तंभूत माहिती दिली जात आहे. त्यामुळे थेट नसला तरी मतदारांशी त्यांचा संपर्क जुळलेला आहे.
यासंदर्भात भाजपाच्या ‘आयटी सेल’ची धुरा सांभाळणाऱ्या संदीप जोशी यांच्याशी संपर्क साधला असता, मतदार जेथे आहेत आणि जेथे त्याला सुविधाजनक स्थिती आहे, त्या ठिकाणी पोहोचण्याचा सोशल मिडिया हाच एकमेव मार्ग आहे. पत्रकांवर त्वरित प्रतिक्रिया देता येत नाही किंवा उमेदवारापर्यत मतदारांची प्रतिक्रिया पोहोचू शकत नाही. सोशल मिडिया हा सर्वांपर्यंत पोहोचण्याचा आणि प्रतिक्रिया जाणून घेण्याचा एकमेव मार्ग असल्याने त्याचा वापर केला जात आहे. ते स्वत:च्या मतदारसंघात वेळ देऊ शकत नसले तरीही त्यांचा आजवरचा जिंकून येण्याचा मतांच्या आकडेवारीचा आलेख चढताच राहिला आहे. आता संपूर्ण राज्याची जबाबदारी असल्यामुळे सोशल मिडिया अधिक प्रभावी ठरणार, असे जोशी म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांच्या ‘आयटी-वॉररूम’ची चर्चा
सोशल मिडियावर ट्विटरच्या माध्यमातून ‘टिवटिव’ करणारा, फेसबुकच्या माध्यमातून ‘कॉमेंट आणि लाईक’ करणारा, व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून ‘मॅसेज’ची देवाणघेवाण करणारा आणि ईमेलच्या माध्यमातून ‘पत्रव्यवहार’ करणाऱ्यांमध्ये युवा पिढीचा मोठा सहभाग आहे.
![देवेंद्र फडणवीस यांच्या ‘आयटी-वॉररूम’ची चर्चा](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2014/09/1841.jpg?w=1024)
First published on: 30-09-2014 at 08:08 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp it war room in maharashtra