हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारची कोंडी करणारी रणनिती निश्चित करण्यासाठी भाजपची महत्वपूर्ण बैठक उद्या, २७ नोव्हेंबरला अकोल्यातील मराठा मंडळाच्या कार्यालयात सकाळी १० वाजता होत आहे. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, प्रदेश संघटन मंत्री रवींद्र भुसारी व विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, विनोद तावडे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आमदार देवेंद्र फडणवीस यांच्यासह दिग्गज नेते उपस्थित राहतील. नागपूरला हिवाळी अधिवेशनादरम्यान ११ डिसेंबर रोजी ११ लाख लोकांचा मोर्चा आणि घेरावाचे बैठकीत नियोजन केले जाणार आहे. या बैठकीकडे राज्य शासनाचे लक्ष लागले आहे.
सध्याची राजकीय परिस्थिती, आगामी लोकसभा निवडणूक, भ्रष्टाचार, गॅस दरवाढ, महागाईचा विरोध, याबरोबरच पक्ष संघटनेच्या मजबूत बांधणीसाठी ११ डिसेंबरचा मोर्चा काढण्यात येणार आहे. मोच्र्यासाठी कार्यकर्त्यांना ११ डिसेंबरला नागपूरमध्ये मोठय़ा संख्येने कसे आणायचे, याची आखणी केली जाणार आहे. विधिमंडळ अधिवेशनाच्या पाश्र्वभूमीवर पक्षाचा प्रत्येक पदाधिकारी व लोकप्रतिनिधींना या संदर्भातील जबाबदारी देण्यात येईल.
या मोच्र्याच्या माध्यमातून हिवाळी अधिवेशनातील वातावरण तापवण्याचा प्रयत्न राहणार आहे. प्रसंगी पोलिसांची बंदी धुडकावून विधिमंडळा घेराव घालण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यासंबंधीची कार्यकर्त्यांची व्यूहरचना या बैठकीत ठरेल. त्यामुळे या बैठकीकडे राज्य शासनाबरोबर पोलीस विभागानेही लक्ष केंद्रित केले आहे.
राज्य सरकारला कोडींत पकडण्यासाठी हिवाळी अधिवेशनात निघणाऱ्या या मोर्चा व घेरावाला सरकार कसे हाताळते, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.