भाजपमध्ये उभी फूट पडण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. पक्षातून निलंबित केलेल्या नेत्यांना पक्षात पुन्हा आणण्यासाठी सुरू असलेल्या रणनीतीमुळे ही शक्यता बळावली. भाजप जिल्हाध्यक्ष पद हे रणधीर सावरकर यांच्याकडे तर महिला आघाडीचे जिल्हाध्यक्ष पद स्मिता राजनकर यांच्याकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात हे संघटन सचिव होण्याची चर्चा पक्षात सुरू झाली असून या सर्व कारणांमुळे पक्ष फुटीच्या उंबरठय़ावर असल्याची माहिती मिळाली.
भाजपमधून निलंबित केलेले विजय अग्रवाल यांना पुन्हा पक्षात प्रवेश देण्यासाठी भाजप मधील एका गटाने पुढाकार घेतला आहे. यासाठी रामनवमीच्या दिवशी एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पुढाकारामुळे पक्षातील इतर नेत्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. पक्षाच्या नुकत्याच झालेल्या एका बैठकीत या विषयी थेट पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. महापालिकेत निधी देण्यासाठी विरोध, महापालिकेत भाजपची सत्ता स्थापन करण्यात अडचण निर्माण करणे, पक्षात आलेल्या अपक्षांमध्ये फूट पाडणे, स्थायी समिती निवडणूक, विकास निधी बाबत मतभेद निर्माण करणे, स्वीकृत सदस्य निवडणुकीत भाजपला या हकालपट्टी केलेल्या नेत्यामुळे फटका बसल्याचा पाढा पदाधिकाऱ्यांनी वाचला. या वेळी उघड नाव घेत झालेली टीका एका पक्षातील एका आमदारांना पसंत पडली नसल्याची माहिती मिळाली. या नाराजीकडे दुर्लक्ष करत विजय अग्रवाल यांचा प्रवेश निश्चित करण्याकडे अनेकांचा कल आहे.
भाजपमधील जिल्हा कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांचा शहरातील वाढत्या हस्तक्षेपाला येथे विरोध करण्यात आला. त्यामुळे अग्रवाल यांचा प्रवेश पक्षात झाल्यास पक्षात फूट पडण्याची दाट शक्यता भाजपमधील सूत्रांनी व्यक्त केली. त्यामुळे भाजपला येत्या लोकसभा व जिल्हा परिषद निवडणुकीत याचा फटका बसण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.
ही अडचण उभी झाल्यास काय करायचे या विषयी संघ परिवारात खलबते सुरूआहेत. या सर्व घडामोडींवर संघ परिवारातील अनेकांचे लक्ष असल्याची माहिती मिळाली.
दरम्यान, भाजप जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात यांना अमरावती व वाशीम जिल्ह्य़ाचे संघटन सचिव करीत जिल्हाध्यक्ष हे पद खासदार धोत्रे यांचे नातेवाईक विद्यमान सरचिटणीस रणधीर सावरकर यांच्याकडे जाण्याची चिन्हे आहे. राष्ट्रवादीतून नव्याने आलेल्या व भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष भारती गावंडे यांना प्रदेशात पाठवून त्यांचा जागी स्मिता राजनकर यांची वर्णी लागण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत झालेल्या पराभवातून पक्षाने बोध घेतला नसल्याची चर्चा पक्षात होती.
पक्षातील हा बदल येत्या काही दिवसात होण्याची चिन्हे आहेत. या बदलावर पक्षातील काहींनी नाराजी व्यक्त केली आहे. पक्षातील काही नेत्यांच्या फायद्यासाठी संपूर्ण पक्ष दावणीला बांधल्या जाणे चुकीचे असल्याचे मत पक्षातील अनेकांनी व्यक्त केले.
पक्षातील हकालपट्टी झालेल्या नेत्यांचा पुनप्र्रवेश व पक्षातील पदाधिकाऱ्यांचे खांदेपालट पाहता पक्षात मोठी फूट पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही फूट टाळण्यासाठी प्रदेश पातळीवरील नेत्यांनी तात्काळ लक्ष देण्याची गरज आता पक्षातील जुने जाणते कार्यकर्ते व माजी पदाधिकारी व्यक्त करीत आहेत.

Story img Loader