विरोधकांच्या पदद्यामागील हालचालींना अखेरच्या क्षणी अपयश आले म्हणून बुधवारी झालेल्या निवडणुकीत जिल्हा परिषद अध्यक्षपदी भाजपचे विजय शिवणकर, तर उपाध्यक्षपदीही भाजपचेच मदन पटले आरूढ झाले. बहुमतात असलेल्या भाजपला आपली सत्ता राखण्यात यश आले खरे, पण भाजप व मित्रपक्षांसह अपक्षांच्या सहकार्याने २९ ही संख्या दिसत असली तरी हा आकडा पार करण्याकरिता पक्षातील वरिष्ठांना बरीच कवायत करावी लागली. विरोधी पक्षांकडून उपाध्यक्षपदासह सभापतीपद त्यांचे समर्थन करणाऱ्या इतरांना देऊन अध्यक्षपद हिसकावण्याचे भरपूर प्रयत्न झाले, पण जादुई आकडय़ांकरिता गरज असलेल्या एकमात्र सदस्यांनी ऐन वेळेवर हुलकावणी दिल्यामुळे विरोधी पक्षाचे हे गणित चुकले आणि बरेच प्रयत्न केल्यावरही त्यांना अपयश आले.
विरोधी पक्षांनी बहुमतात असलेल्या, पण वेगवेगळ्या नेत्यांच्या गटात विभागलेल्या भाजपच्या सदस्यांना आपल्याकडे वळविण्याचे प्रयत्न अखेरच्या आठवडय़ापासून सुरू केले होते. या भाजप सदस्यांचा फायदा उचलण्याचे त्यांचे मनसुबे होते कुठे माशी िशकली कुणास ठावूक, पण ही बाब भाजपच्या वरिष्ठांना कळल्यानंतर त्यांनी त्या एकमात्र सदस्याला भाजपकडूनच सभापतीपद वा इतर बाबी लाभ दिले जाण्याची हमी दिल्यानंतर जाता जाता अखेर तो सदस्य भाजपकडेच थांबल्यामुळे विरोधी पक्षांनी केलेली सर्व जुळवाजुळव अखेर अपयशी ठरली. एकूण ५२ सदस्यीय जिल्हा परिषदेत भाजपची सदस्य संख्या २७ आहे. त्यांना एक शिवसेना व एका अपक्ष सदस्याचे समर्थन गेल्या वेळेपासूनच मिळत आहे. कॉंग्रेसचे १३ सदस्य असून राष्ट्रवादीचे १० सदस्य आहेत. त्यांना  अध्यक्षपदासाठी चार इतर सदस्यांची गरज होती. या मोबदल्यात विरोधी पक्षांनी उपाध्यक्षांसह सभापतीपद व रोख रक्कम आदी प्रलोभने इतर सदस्यांकरिता ठेवले होते.
यात उपाध्यक्षपदाकरिता आसुसलेल्या एका भाजप सदस्याला आपल्या चमूत घेण्याची तयारी त्यांना करायची होती. याकरिता त्यांनी सर्व व्यवस्था केली. तसेच इतर एका भाजप सदस्याला सभापतीपदासह रोख रक्कमेची हमी देऊन आपल्याकडे वळविले सुद्धा होते. हा सदस्य काही क्षणांपुरता त्यांच्या चमूत दाखलही झालेला होता. समर्थन करणाऱ्या या दोन सदस्यांना पक्षबदल कायदा आड येऊ नये, याकरिता त्यांना सभागृहात गरहजर राहण्याची व्यूहरचना आखण्यात आली होती, पण अध्यक्षपदासाठी नितांत गरज असलेल्या त्या एका सदस्याने पक्षश्रेष्ठींकडून मिळालेल्या आदेशानुसार  व सत्तापक्षातील वरिष्ठांकडून मिळालेल्या माफक आश्वासनानंतर ऐन वेळेवर सत्तापक्षासोबतच राहणार असल्याचे सुचविल्यानंतर अखेर विरोधी पक्षाची ही कोंडी फुटली. त्यामुळे निवडणुकीच्या दिवशीही सभागृहात होणाऱ्या निर्णयावर संपूर्ण जिल्ह्य़ाचे लक्ष लागून होते.
ही बाब जिल्हा परिषद आवाराबाहेरील प्रांगणात समसंख्येत असणाऱ्या भाजप व कॉंग्रेस आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या संख्येवरून दिसून येत होती, पण अखेर भाजपने अध्यक्ष व उपाध्यक्षपद व २९ जानेवारीला होणाऱ्या सभापतीपदाच्या निवडणुकीकरिता केलेल्या नवीन मोच्रेबांधणीला यश आले  व   विरोधी    पक्षांचे    मनसुबे त्या एका सदस्यामुळे उध्वस्त झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

Story img Loader