मुंबईत पत्रकारावर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या पाश्र्वभूमीवर, महिलांना संरक्षण देण्यात आणि राज्याची कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यात अपयशी ठरलेले राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी सोमवारी नाशिक शहर भाजपच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको करण्यात आला.
मुंबईतील शक्ती मिल परिसरात घडलेल्या या घटनेच्या निषेधार्थ भाजपतर्फे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रदेश चिटणीस सीमा हिरे, शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, नगरसेविका प्रा. देवयानी फरांदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात महिला कार्यकर्त्यां मोठय़ा संख्येने सहभागी झाल्या. गृहमंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलकांनी रस्त्यावर ठाण मांडल्याने पोलीस यंत्रणेची तारांबळ उडाली. रास्ता रोकोमुळे काही काळ वाहतूकही विस्कळीत झाली. मुंबईतील घटनेत संबंधित मुलीचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झाले. या पद्धतीने अनेक मुली व महिलांवर अन्याय, अत्याचार व बलात्कार होत आहेत. काही जणी न्याय मिळेल याची खात्री नसल्याने पोलिसांकडे जात नाही, याकडेही आंदोलकांनी लक्ष वेधले.
सातत्याने घडणाऱ्या बलात्काराच्या घटनांनी राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा पूर्णत: बोजबारा उडाला आहे. दररोज अनेक दुर्दैवी घटना घडत असून त्यावर नियंत्रण आणण्यात पोलीस यंत्रणा अपयशी ठरली, असा आरोप आंदोलकांनी केला. मंत्र्यांची संरक्षण व्यवस्था आणि हप्तेबाजी या पलीकडे ही यंत्रणा कोणतेही काम करत नाही. गुन्हेगारी वाढत असताना शासन व पोलीस त्याकडे दुर्लक्ष करण्याची भूमिका घेत आहेत. गृहखात्याच्या निष्क्रियतेचा निषेध करत आंदोलकांनी उपरोक्त खटला जलदगती न्यायालयात चालवावा आणि आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, तसेच गृहमंत्री पाटील यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. सुजाता करजगीकर, सुनील केदार, सुरेश अण्णा पाटील, गोविंद बोरसे आदी सहभागी झाले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा