बिहारमधील बोधगया येथे बॉम्बस्फोटाच्या माध्यमातून झालेल्या भ्याड हल्ल्याचा मंगळवारी भाजपतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाद्वारे निषेध करण्यात आला. या वेळी काँग्रेस व बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर टीकास्त्र सोडण्यात आले.
बोधगया येथील साखळी बॉम्बस्फोटात अनेक जण जखमी झाले. या घटनेच्या पाश्र्वभूमीवर, भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. भाजपचे शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, उपमहापौर सतीश कुलकर्णी, प्रदेश चिटणीस सीमा हिरे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमा झाले. बॉम्बस्फोटाच्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. ज्या गौतम बुद्धांनी सर्व जगाला शांती व समतेचा संदेश दिला, त्या ठिकाणी हे कृत्य घडणे म्हणजे कायदा व सुव्यवस्थेचा बोजबारा उडाल्याचे दिसत आहे. केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी यापूर्वीच बिहारचे महाबोधी मंदिर दहशतवाद्यांच्या निशाणीवर असल्याचे बिहार व स्थानिक पोलिसांना कळविले होते. असे असताना बिहार शासनाने ही बाब गांभीर्याने घेतली नाही, असा आक्षेप भाजपच्या नेत्यांनी नोंदविला. विकासाच्या व सुरक्षेच्या नावावर गप्पा मारणारे आणि इतर राज्यांवर सतत टीका करणाऱ्या बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी जनतेचा भ्रमनिरास केल्याचा आरोप भाजपच्या आंदोलकांनी केला.
हा हल्ला पूर्वनियोजित होता तर केंद्र व राज्य शासनाने वेळीच खबरदारी का घेतली नाही, असा प्रश्न करत भाजपने केंद्र व बिहार शासन कायदा व सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरल्याचे निवेदनही जिल्हाधिकाऱ्यांना दिले. आंदोलनात बाळासाहेब सानप, सुरेश अण्णा पाटील, देवदत्त जोशी, सुनील केदार, सुजाता करजगीकर आदी सहभागी झाले होते.
बोधगयातील बॉम्बस्फोटाचा भाजपतर्फे निषेध
बिहारमधील बोधगया येथे बॉम्बस्फोटाच्या माध्यमातून झालेल्या भ्याड हल्ल्याचा मंगळवारी भाजपतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाद्वारे निषेध करण्यात आला. या वेळी काँग्रेस व बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर टीकास्त्र सोडण्यात आले.
First published on: 10-07-2013 at 01:10 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp protests against bomb blasts in gaya