अतिवृष्टीने शेतकरी व मासेमारावर मोठे संकट निर्माण झाले आहे. मात्र, शासनाने त्यांच्यासाठी उपाययोजना केल्या नाहीत. आजवर अनेकदा अनेक बाबींसंदर्भात शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य जनतेवर शासनाने सहानुभूतीपूर्वक मदत देण्याऐवजी मदतीच्या नावावर त्यांची पिळवणूक करून अत्याचारच करीत आहे. त्यामुळे अशा जनहितविरोधी शासनाला सत्तेतून हटवा, असे आवाहन आमदार राजकुमार बडोले यांनी केले.
जिल्ह्य़ात झालेल्या अतिवृष्टीनंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यासंदर्भात आयोजित मोर्चादरम्यान ते बोलत होते. भाजपतर्फे आयोजित या मोर्चाला कोहमारा येथून सुरुवात करून सडक अर्जुनी तहसील कार्यालयात मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल प्रामुख्याने उपस्थित होते.
 जिल्ह्य़ातील बहुतांश क्षेत्र हे जंगलग्रस्त असून बुरड व मासेमारी करणारा समाज मोठा आहे. जिल्हावासीयांचे आíथक उत्पन्नाचे स्रोत हे धानशेती असून यंदाच्या अतिवृष्टीमुळे शेतकरी, मच्छिमारांसह सर्वसामान्य नागरिकांचे मोठे नुकसान झाले. मात्र, पीडितांना आश्वासना पलीकडे काहीही मिळाले नाही. अशावेळी पीडितांच्या पाठीशी शासन व प्रशासनाने राहण्याऐवजी, थोडेफार उरलेले धानपीक वाचविण्याच्या धडपडीत असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतातील वीज पंपांचा वीज पुरवठा कापण्याचा प्रताप समोर आला. मात्र, शासनही यावर गप्प बसले आहे. त्यामुळे हे शासन शेतकरी, शेतमजूर, मच्छिमार व सर्वसामान्यांच्या हिताविरोधात धोरण राबवित असल्याचे उघड झाले आहे. अशा शासनाला स्वविकासासाठी उखडून फेका, असे आवाहन आमदार बडोले यांनी केले.
यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल म्हणाले, भ्रष्टाचार व घोटाळ्यांनी बरबटलेल्या या काँग्रेस शासनात महिलांची अब्रुही सुरक्षित नाही. वृद्धांसाठी असलेल्या योजना केवळ कागदीघोडे ठरविण्याचे काम प्रशासन करीत आहे. जिल्ह्य़ावर ओला दुष्काळ ओढावला असून यावेळी मायेचा, मदतीचा हात पुढे करण्याऐवजी सत्ताधारी स्वहितासाठी त्याचे राजकारण करीत आहेत. अशा स्वार्थी सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवून द्या. दरम्यान, अतिवृष्टीने नुकसान झालेल्यांना शासनाने मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनात शेतकरी मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा