जिल्ह्य़ातील आठ नगर पालिकांच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदांसाठी बुधवारी झालेल्या निवडणुकीत आघाडी व महायुतीला प्रत्येकी चार पालिकांवर वर्चस्व मिळवता आले. मोहपा नगर पालिकेतील भाजपच्या तीन बंडखोर नगरसेवकांनी काँग्रेसला पाठिंबा दिल्याने राडा झाला. भाजपच्या कार्यकर्त्यांनी बंडखोर नगरसेवकांना मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याने तणाव निर्माण झाला.
जिल्ह्य़ातील मोहपा, खापा व उमरेड नगर पालिकांमध्ये काँग्रेसचे नगराध्यक्ष व उपाध्यक्ष निवडून आले. कळमेश्वर व रामटेक पालिकांवर शिवसेनेला भगवा फडकविता आला. काटोल पालिका शेकापकडे, नरखेड पालिका जनशक्ती व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडे तर कामठी पालिका सुलेखा कुंभारे गट व भाजप युतीकडे गेली आहे.
कळमेश्वर नगर पालिका अध्यक्षपदी शिवसेनेच्या विद्या सोसे तर उपाध्यक्षपदी भाजपचे कृष्णा गावंडे निवडून आले. सोसे व गावंडे यांना प्रत्येकी ९ मते तर त्यांचे प्रतिस्पर्धी शीतल सातपुते व अॅड. जयश्री पवार यांना प्रत्येकी ८ मते मिळाली. मोहपा पालिका अध्यक्षपदी काँग्रेसचे शमसुद्दीन शेख व उपाध्यक्षपदी काँग्रेसचे माधव चर्जन निवडून आले. खापा नगर पालिकेची निवडणूक बिनविरोध झाली. अध्यक्षपदी काँग्रेसचे पराग टिचखेडे यांची निवड झाली. काटोल पालिकेत शेकापचे राहुल देशमुख यांची अध्यक्षपदी व धर्मराज शेलेकर यांची उपाध्यक्षपदी निवड झाली.
नरखेड पालिकेवर जनशक्ती आघाडीने वर्चस्व मिळविले. अध्यक्षपदी जनशक्तीच्या हेमलता टेकाडे व उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अशरफ कुरेशी यांची निवड झाली. रामटेक पालिका अध्यक्षपदी नलिनी चौधरी व उपाध्यक्षपदी कारेमोरे, उमरेड पालिका अध्यक्षपदी कुंदा पवनीकर व उपाध्यक्षपदी रेवतकर, कामठी पालिका अध्यक्षपदी रिजवान कुरेशी व उपाध्यक्षपदी रंजात तपेकर यांची निवड झाली.
जिल्ह्य़ातील आठ पालिकांच्या निवडणुकीत आघाडीला चार तर महायुतीलाही चार पालिकांवर सत्ता मिळविता आली. मोहप्यातील राडा वगळता इतर सातही पालिकांची निवडणूक शांततेत पार पडली.
मोहपा नगरपालिका निवडणुकीत राडा; भाजप बंडखोराचा काँग्रेसला पाठिंबा
जिल्ह्य़ातील आठ नगर पालिकांच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदांसाठी बुधवारी झालेल्या निवडणुकीत आघाडी व महायुतीला प्रत्येकी चार पालिकांवर वर्चस्व मिळवता आले. मोहपा नगर पालिकेतील भाजपच्या तीन बंडखोर नगरसेवकांनी काँग्रेसला पाठिंबा दिल्याने राडा झाला.
First published on: 07-08-2014 at 08:39 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp rebel will work against party in mohpa nagar palika election