वाढत्या महागाईने आणि अन्याय, अत्याचारांनी त्रस्त झालेल्या महिलांचा आवाज विधानभवनापर्यंत पोहोचविण्यासाठी महिला संग्राम यात्रा सुरू करण्यात आली आहे. या यात्रेच्या माध्यमातून विधानभवनाला घेराव घालून राज्यभरातील महिला त्यांचा संताप व्यक्त करतील, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्ष महिला आघाडीच्या अध्यक्षा नीता केळकर यांनी बुधवारी केले.
महाराष्ट्र प्रदेश भाजप महिला आघाडीच्या वतीने बुधवारपासून संग्राम यात्रा आयोजित करण्यात आली आहे. पुण्यातील झाशीची राणी पुतळ्याला तसेच सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून महात्मा फुले वाडय़ापासून या यात्रेचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी केळकर बोलत होत्या. महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस उमा खापरे, माधवी नाईक, शहराध्यक्षा, नगरसेविका प्रा. मेधा कुलकर्णी, आमदार गिरीश बापट, माधुरी मिसाळ, शहराध्यक्ष प्रा. विकास मठकरी, तसेच माजी आमदार रूपलेखा ढोरे, महापालिकेतील गटनेता अशोक येनपुरे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. यात्रेची सांगता ११ डिसेंबर रोजी नागपूर येथे होईल.  महाराष्ट्र प्रदेश भाजपतर्फे ११ डिसेंबर रोजी विधिमंडळाला घेराव घालण्यात येणार असून त्याच दिवशी ही यात्रा नागपुरात पोहोचेल. पक्षाच्या दहा हजार महिला यावेळी उपस्थित राहणार असल्याचे केळकर यांनी सांगितले.
राज्यातील आघाडी सरकारचे अपयश, वाढती महागाई, महिलांवर सातत्याने होत असलेले अत्याचार यांच्या विरोधात आणि महिलांचा उद्वेग व्यक्त करण्यासाठी ही यात्रा असल्याचेही त्या म्हणाल्या.     

Story img Loader