विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात भाजपने मुसंडी मारत ४ जागा तर शिवसेना व राष्ट्रवादीने प्रत्येकी ४ आणि काँग्रेसने दोन जागांवर विजय मिळविला. निवडणुकीत मनसेची वाताहत झाली असून शहरातील या पक्षाचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. माकपने आपले खात उघडले. गतवेळच्या निकालाची तुलना केल्यास भाजपला तीन, राष्ट्रवादीला एक तर माकपला एका जागेचा लाभ झाला. शिवसेनेचे संख्याबळ ‘जैसे थे’ राहिले. अतिशय चुरशीच्या बहुरंगी लढतीत अनेक दिग्गजांना पराभूत व्हावे लागले.
नाशिक शहरातील तीन मतदार संघात भाजपने एकहाती विजय मिळविला. नाशिक मध्य मतदारसंघात भाजपच्या प्रा. देवयानी फरांदे यांनी (६१५४८) मते मिळवून मनसेचे वसंत गिते (३३२७६) यांना मोठय़ा फरकाने पराभूत केले. काँग्रेस व शिवसेनेचे उमेदवार अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या स्थानी फेकले गेले. नाशिक पूर्व मतदार संघात भाजपच्या बाळासाहेब सानप (७८९४१) यांनी शिवसेनेच्या चंद्रकांत लवटे (३२५६७) यांचा पराभव केला. राष्ट्रवादीचे उमेदवार तिसऱ्या स्थानी तर मनसेचा उमेदवार थेट चवथ्या स्थानी फेकले गेले. नाशिक पश्चिममध्ये भाजपचे वर्चस्व राहिले. या पक्षाच्या सीमा हिरे (६७४८९) यांनी शिवसेनेचे सुधाकर बडगुजर (३८८१९) यांना पराभूत केले. देवळालीत शिवसेनेला बालेकिल्ल्यात वर्चस्व कायम ठेवण्यात यश मिळाले. या ठिकाणी शिवसेनेचे योगेश घोलप (४९७५१) यांनी भाजपच्या रामदास सदाफुले (२१५८०) यांचा पराभव केला. मालेगाव बाह्य मतदारसंघात शिवसेनेच्या दादा भुसे (८१८२५) यांनी भाजपच्या पवन ठाकरे (४४२८३) यांना तर मालेगाव मध्यमध्ये काँग्रेसच्या असिफ शेख (७५३२६) यांनी राष्ट्रवादीचे मुफ्ती मोहंमद इस्माईल (५९१७५) यांना पराभूत केले. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते छगन भुजबळ यांनी शिवसेनेचे संभाजी पवार यांचा ४६४४२ मताधिक्याने पराभूत केले. भुजबळ यांना (११२७८७) मते मिळाली तर विरोधी उमेदवार पवार यांना (६६३४५) मते मिळाली. नांदगाव मतदारसंघात छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांनी विजय संपादीत केला. त्यांनी शिवसेनेच्या सुहास कांदे यांना पराभूत केले. पंकज भुजबळ यांना (६९२६३) मते मिळाली. बागलाणमध्ये राष्ट्रवादीच्या दीपिका चव्हाण (६८४३४) यांनी भाजपच्या दिलीप बोरसे (६४२५१) यांचा पराभव केला.
कळवण मतदारसंघात धक्कादायक निकाल लागला. सलग आठ वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे राष्ट्रवादीचे उमेदवार ए. टी. पवार यांना माकपच्या जिवा पांडू गावित यांनी पराभूत केले. गावित यांना (६७७९५) तर पवार यांना (६३००९) मते मिळाली. या माध्यमातून माकपने हा मतदारसंघावर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यात यश मिळविले. चांदवड मतदारसंघात भाजपच्या डॉ. राहुल आहेर (५९९४६) यांनी काँग्रेसचे शिरीषकुमार कोतवाल (४३७८५) यांना पराभूत केले. सिन्नरमध्ये शिवसेनेच्या राजाभाऊ वाजे (१०४०३१) यांनी भाजपच्या माणिक कोकाटे (८३४७७) यांना पराभूत केले. निफाड मतदारसंघात शिवसेनेचे अनिल कदम (७८१८६) यांनी राष्ट्रवादीचे दिलीप बनकर (७४२६५) यांना पराभवाची धुळ चारली. दिंडोरी मतदारसंघात राष्ट्रवादीचे नरहरी झिरवाळ (६८२८४) यांनी शिवसेनेचे धनराज महाले (५५६५१) यांना पराभूत केले. इगतपुरी मतदारसंघात काँग्रेसच्या निर्मला गावित (४९१२८) यांनी शिवसेनेच्या शिवराम झोले (३८७५१) यांना पराभूत केले.
सात आमदारांना घरचा रस्ता
विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सात आमदारांना मतदारांनी घरचा रस्ता दाखविला. सलग आठ वेळा निवडून आलेले राष्ट्रवादीचे कळवण मतदारसंघातील उमेदवार ए. टी. पवार पराभूत झाले. मनसेचे ज्येष्ठ नेते वसंत गिते यांना मतदारांनी घरचा रस्ता दाखविला. सिन्नर मतदार संघातील भाजपचे उमेदवार माणिक कोकाटे, चांदवड मतदार संघातील काँंग्रेसचे उमेदवार शिरीषकुमार कोतवाल, मालेगाव मध्यमधील राष्ट्रवादीचे मुफ्ती मोहंमद इस्माईल, दिंडोरीतील शिवसेनेचे उमेदवार धनराज महाले, नाशिक पश्चिममधील मनसेचे उमेदवार नितीन भोसले या सात आमदारांना पराभवाचे धनी व्हावे लागले.

Story img Loader