गेल्या महिनाभरापासून निवडणूक निकालाची उत्सुकता लागलेली असताना प्रत्येकाचे लक्ष नागपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघांतील मतमोजणी होणार असलेल्या कळमना मार्केट परिसराकडे लागले होते. मात्र, नागपूर आणि रामटेक मतदारसंघांतील मतमोजणीची प्रक्रिया संथपणे सुरू असल्याने दुपापर्यंत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येत नव्हता. पण, मतमोजणी केंद्रापासून काही अंतरावर काही अतिउत्साही नागरिक आणि कार्यकर्ते आतल्या परिस्थितीचा आढावा घेत होते. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असल्याने यंदा कार्यकर्त्यांना जल्लोष साजरा करता आला नाही. दरम्यान, दुपारनंतर भाजपचे नितीन गडकरी आणि सेनेचे कृपाल तुमाने यांनी पहिल्या फेरीपासून मोठी आघाडी घेतली असल्याची बातमी शहरात पसरताच कार्यकत्यार्ंनी ढोल ताशांच्या निनादात गुलाल उधळीत जल्लोश केला.
प्रत्येक फेरीनंतर महायुतीचे उमेदवार आघाडीवर असल्यामुळे काँग्रेसचे समर्थक मतदान केंद्राच्या बाहेर आले होते. गडकरी आणि तुमाने यांचा विजय निश्चित मानला जात असला तरी दोघेही उमेदवार किती मतांनी समोर आहेत, विदर्भात कोणाला किती मते मिळाली यांचा अंदाज घेत मतमोजणी केंद्राच्या परिसरात कार्यकर्ते चर्चा करीत होते. पोलिसांच्या कडक सुरक्षा व्यवस्थेत रामटेक व नागपूर लोकसभा मतदारसंघांच्या मतमोजणीला आज सकाळी ८ वाजता सुरुवात झाली असली तरी मतदान केंद्राच्या बाहेर मात्र दुपारी १ नंतर नागरिक आणि कार्यकर्त्यांची गर्दी होऊ लागली. रामटेक लोकसभा मतदारसंघातून शिवसेना आणि काँग्रेसचे कार्यकर्ते मोठय़ाप्रमाणात आले होते. मतमोजणी केंद्रात प्रवेशपत्राशिवाय प्रवेश नसल्यामुळे अनेक लोकांना मतमोजणी केंद्रापासून चार कि.मी. दूरच थांबविण्यात आले होते. जसजसा प्रत्येक फेरीचा निकाल घोषित केला जात होता तसे भाजपचे कार्यकर्ते जल्लोश करीत होते. यावर्षी कार्यकत्यार्ंना मतमोजणी केंद्रापासून जवळपास २ किमी दूर रोखण्यात आले होते, त्यामुळे कार्यकत्यार्ंना पायपीट करावी लागली.
आठव्या आणि नव्या फेरीअखेर दोन्ही उमेदवारांनी मोठी आघाडी घेतल्याने कार्यकर्त्यांमध्ये जल्लोशाचे वातावरण होते. महालातील गडकरी वाडय़ावर सकाळपासून कार्यकर्ते जमू लागले होते. गडकरी यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध धर्मातील लोकांनी निवासस्थानी गर्दी केली. यावेळी ढोल ताशांच्या निनादात महिला आणि युवा कार्यकर्ते जल्लोश करीत होते.
मतमोजणी केंद्रात प्रवेशपत्राशिवाय प्रवेश नसल्यामुळे अनेक कार्यकर्ते मोबाईलच्या माध्यमातून मतमोजणी केंद्रात असलेल्या कार्यकर्त्यांकडून कोणाला किती मते मिळाली, याचा अंदाज घेत होते. मतमोजणी परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त लावण्यात आला होता. एरवी कुठल्याही निवडणुकीला मतदान मोजणी केंद्राच्या बाहेर विविध राजकीय पक्षाचे ध्वज दिसायचे, मात्र आज सगळीकडे कमळाचे ध्वज आणि बॅनर दिसत होते. महापौर अनिल सोले, आमदार सुधाकर देशमुख, देवेंद्र फडणवीस, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे आदी पक्षाचे नेते मतदान केंद्राच्या परिसरात आले होते. दुपानंतर शहरातील विविध भागात फटाक्याची आतषबाजी करण्यात आली होती. रामटेक मतदार संघातून मोठय़ा प्रमाणात कार्यकर्ते आले होते. ग्रामीण भागात उमरेड, रामटेक, काटोल, कळमेश्वर हिंगणा या परिसरात तुमाने यांच्या विजयाबद्दल जल्लोश केला जात होता. रस्त्यावर जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना पेढे व लाडू वाटण्यात आले. सकाळी मतमोजणीला प्रारंभ होताच अनेक लोकांनी घरी बसून दूरचित्रवाणीच्या विविध वाहिन्यांवरील बातम्यांद्वारे निवडणुकीचा मागोवा घेणे पसंत केले होते.

Story img Loader