महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोन भव्य जाहीर सभा घेऊनही कल्याण-डोंबिवलीत मनसेच्या चार उमेदवारांचा पाडाव झाला. कल्याण-डोंबिवली महापालिकेत मनसेचे २८ नगरसेवक आहेत. याच भागात मनसेचे दोन आमदार मागील निवडणुकीत निवडून आले होते. त्यामुळे यंदाही मनसेचे इंजिन या भागात चालेल अशी हवा निर्माण करण्यात आली होती; परंतु भाजपच्या झंझावातापुढे मनसेचे इंजिन फार वेगाने पळू शकले नाही.
कल्याण पश्चिम, डोंबिवलीत भाजपने बाजी मारली. ग्रामीणमध्ये शिवसेनेने, तर कल्याण पूर्व भागात अपक्ष उमेदवाराने विजय मिळवला. डोंबिवली भाजप युतीचा बालेकिल्ला मानला जातो. युती तुटल्यामुळे येथे या वेळी भाजप आणि सेनेत दुरंगी लढत झाली. भाजपचे रवींद्र चव्हाण यांना ८३ हजार ८४४ मते मिळाली. सेनेच्या दीपेश म्हात्रेंना ३७ हजार ६२४ मते मिळाली. ४४ हजार मतांच्या फरकांनी चव्हाण विजयी झाले. डोंबिवलीत मनसेसह अन्य नऊ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. डोंबिवलीत नकाराधिकाराचा २ हजार १३ जणांनी वापर केला. मनसेचे हरिश्चंद्र पाटील यांना ११ हजार ९७० मते मिळाली. मनसेच्या डोंबिवलीतील नगरसेवकांच्या प्रभागात हरिश्चंद्र पाटील निव्वळ एक हजाराहून अधिक मते मिळू शकली नाहीत. पाटील प्रत्येक प्रभागातील फेऱ्यांमध्ये तीनशे ते चारशे मते मिळवत होते. त्यामुळे मनसे नगरसेवकांच्या कामगिरीबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एका पदाधिकाऱ्याने यापूर्वीच राजीनामा दिला असल्याची चर्चा आहे. नगरसेवकांचेही राजीनामे घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. कल्याण ग्रामीणमध्ये शिवसेनेचे सुभाष भोईर यांनी ८४ हजार ७४ मते मिळवली. मनसेचे व विद्यमान आमदार रमेश पाटील यांना ३९ हजार ८८८ मते मिळाली. राष्ट्रवादीच्या वंडार पाटील यांना १९ हजार ७८० मते मिळाली. भोईर यांनी पाटील यांचा ४४ हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. कल्याण पूर्वमध्ये शिवसेनेच्या वाटेवर असलेले अपक्ष गणपत गायकवाड ३६ हजार ३०२ मतांनी विजयी झाले. त्यांनी शिवसेनेचे गोपाळ लांडगे यांचा पराभव केला. लांडगे यांना ३५ हजार ५६१ मते मिळाली. या भागात राष्ट्रवादीचा वरचष्मा असूनही नीलेश शिंदे यांना १९ हजार ३३२, भाजपचे विशाल पावशे यांना २७ हजार ९८० मते मिळाली.
कल्याण पश्चिमेत भाजपचे नरेंद्र पवार यांना ४७ हजार २३८ मते मिळाली. सेनेचे विजय साळवी यांना ४३ हजार ६०४ मते मिळाली. विद्यमान मनसे आमदार प्रकाश भोईर यांना अवघी १६ हजार ९७७ मते मिळाली. संघ, भाजपच्या प्रभावी कामगिरीमुळे या मतदारसंघात पवार यांना लॉटरी लागली. काँग्रेसचे सचिन पोटेंना १७ हजार मते मिळाली. संजय पाटील, प्रकाश मुथा यांच्या अनामत रकमा जप्त झाल्या.

Story img Loader