पहिल्या फेरीतील धक्कादायक कल वगळता मध्य नागपूर मतदारसंघात भाजपचे उमेदवार विकास कुंभारे यांनी शेवटपर्यंत आघाडी कायम ठेवत ३७ हजार ९५८ मतांनी भाजपच्या ताब्यात असलेली जागा कायम राखण्यात यश मिळविले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या या मतदारसंघात दुसऱ्यांदा कमळ फुलल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
मध्य नागपुरात मतमोजणीला सकाळी प्रारंभ झाल्यावर प्रारंभी टपालद्वारे झालेल्या मतांची मोजणी सुरू झाली. त्यानंतर पहिल्या फेरीअखेर काँग्रेसचे अनिस अहमद यांनी भाजपच्या विकास कुंभारे यांच्यापेक्षा १ हजार ३८ मतांनी आघाडी घेतल्यामुळे परिसरात काँग्रेसच्या कार्यकत्यार्ंमध्ये उत्साहाचे वातावरण होते. मात्र त्यानंतर दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या फेरीचे निकाल जाहीर होताच कुंभारे यांनी जवळपास १४ हजारांची आघाडी घेतली त्यानंतर १९ व्या फेरी अखेर २१ हजारांची आघाडी घेतल्यानंतर पसिरात वा रे कमळ आ गया कमळ.. आयेगा भी आयेगा कमल का फूल आयेगा.. विकास कुंभारे यांचा विजय असो.. नितीन गडकरी आगे बढो अशा घोषणा सुरू झाल्या.
 सिव्हील लाईन भागातील पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, शेतकरी वसतिगृहाचा परिसर घोषणांनी दुमदुमन गेला. सातव्या आणि आठव्या फेरीमध्ये अनिस अहमद यांनी आघाडी घेत फरक कमी करीत सहा हजारांवर आणला होता. मात्र, त्यानंतर झालेल्या २१ व्या फेरीअखेरपयर्ंत कुंभारे यांनी आघाडी घेतली आणि अहमद यांचा ३७ हजार ९५८ मतांनी पराभव केला. मतदान सुरू झाले त्यावेळी मतमोजणी केंद्राच्या गर्दी नव्हती. मात्र, कुंभारे यांनी जसजशी आघाडी घेतली तसे भाजपचे कार्यकर्ते मतदान केंद्राच्या बाहेर जमू लागले, विकास कुंभारे सतराव्या फेरी अखेर मतदान केंद्रावर आले आणि होत ढोल ताशांच्या निनाद आणि फटाक्याची आतषबाजी करीत आनंदोत्सव साजरा केला.
 दुसरीकडे काँग्रेसचा होत असलेला पराभव बघता अहमद समर्थक निराश मनाने परत जात होते.  काँग्रेसचे उमेदवार अनिस अहमद यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कामील अंसारी, अपक्ष उमेदवार आभा पांडे, मनसचे श्रावण खापेकर, शिवसेनेचे सतीश हरडे मतदान केंद्राकडे फिरकले नाही. कुंभारे यांना ८७ हजार ३५६ तर अनिस अहमद यांना ४९ हजार ३९८ मते पडली. या मतदारसंघात ९२६ मतदारांनी ‘नोटा’चा वापर केला.

Story img Loader