माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात मंगळवारी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांतर्फे विविध कार्यक्रम करण्यात आले.
भाजपच्या प्रभाग क्रमांक ६४ (सॅलेसबरी पार्क) तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराबरोबरच प्रभागातील विकासकामांचा प्रारंभही मंगळवारी वाजपेयी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून करण्यात आला. नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रभागातील चाळीस लाख रुपयांची विकासकामे सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. शासकीय अनुदानासाठी राष्ट्रीयीकृत बँकेत खाते असणे आवश्यक असल्यामुळे डायस प्लॉट आणि ढोले मळा परिसरातील एक हजार कुटुंबांचे बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये बचत खाते उघडण्याचा कार्यक्रमही करण्यात आला. स्थानिक नगरसेविका कविता वैरागे, पक्षाचे पर्वती मतदार संघाचे अध्यक्ष विश्वास ननावले, तसेच डॉ. भरत वैरागे, हरिष परदेशी, रमेश बिडवे, प्रमिला ठाकूर यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.
‘अटल कथा’ कार्यक्रम
भाजप महिला आघाडीच्या शहराध्यक्षा आणि कथाभारती संस्थेच्या अध्यक्षा प्रा. मेधा कुलकर्णी यांनी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभागातील काही शाळांमध्ये कार्यक्रम आयोजित केले होते. शाळांमध्ये या निमित्ताने ‘अटल कथा’ हा कार्यक्रम करण्यात आला. श्याम भुर्के यांनी या वेळी अटलबिहारी वाजपेयी यांचे जीवनचरित्र कथारुपाने सांगितले. ‘अटल कथा’ या पुस्तकाच्या प्रती यावेळी विद्यार्थ्यांना भेट देण्यात आल्या. भास्करराव रबडे, विनायक हेर्लेकर, जयंत भावे, सुधीर नाईक, श्रीमती भागवत, पालकर यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती. प्रा. कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले.