रावेर लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांचे सासरे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी येथे येऊन आ. गिरीश महाजन यांची भेट घेत आपआपसातील मतभेद संपविण्याच्या दृष्टीने चर्चा केल्याचे बोलले जाते. खडसे व महाजन दोघे जिल्ह्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते असले तरी त्यांच्यातील राजकीय मतभेद सर्वश्रुत आहेत. आपल्यातील या मतभेदाचा फायदा आघाडीच्या उमेदवाराला होऊ नये यासाठी खडसे यांचा प्रयत्न सुरू आहे.
खा. हरिभाऊ जावळे यांची उमेदवारी ऐनवेळी दूर करण्यात आल्यामुळे त्यांच्या समर्थकांची नाराजी दूर करण्याचे कामही खडसे यांना करावे लागत आहे. जामनेर तालुका हा भाजपचा बालेकिल्ला असून लोकसभा निवडणुकीत रक्षा खडसे यांना या तालुक्यातून बहुमत मिळाले पाहिजे, असा आग्रह खडसे यांनी महाजन यांच्याकडे धरला आहे. पत्रकारांशी बोलताना खडसे यांनी निवडणुकीतील राष्ट्रवादीचे उमेदवार मनीष जैन हे तीन वर्षे आमदार, तर त्यांचे वडील ईश्वरलाल जैन राज्यसभेचे सदस्य आहेत. या पिता-पुत्रांनी शेतकऱ्यांच्या कोणत्या समस्या सोडविल्या, असा प्रश्न उपस्थित केला.