दीड वर्षांवर लोकसभा निवडणूक असली तरी नागपुरात राजकीय पक्षांचे जबरदस्त लॉबिंग सुरू झाले आहे. राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळेंच्या महिला मेळाव्याला मिळालेला प्रतिसाद आणि मायावतींच्या जंगी सभेतील गर्दीने भाजपला घाम फुटला आहे. दोन महिला नेत्यांच्या नागपुरात सलग दोन सभा झाल्याने राजकीय संघर्षांचा बिगुल फुंकला गेला असून भाजप आणि काँग्रेसला आता महिला आणि रिपब्लिकन मतांचे आराखडे नव्याने बांधूनच पुढील पावले सावधगिरीने टाकावी लागणार आहेत.
भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी पुढील वर्षीची लोकसभा निवडणूक नागपुरातून किंवा वर्धेतून लढतील, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. राष्ट्रीय अध्यक्षपद गेल्यानंतर गडकरींच्या पाठिशी असलेल्या राजकीय समीकरणांचाही बराच उलटफेर झाला आहे. नागपूर महापालिकेत भाजप सत्तेवर असल्याने अध्यक्षपदी असताना आणि आता नसतानाही नागपुरातील सार्वजनिक समारंभांना वा कोणत्याही कार्यक्रमात गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून जात आहेत. ‘अ‍ॅग्रोव्हिजन’ला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद आणि नंतर राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह यांचा पोलादी हात यामुळे गडकरी यांची राजकीय स्थिती चांगली असली तरी लोकसभा निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने त्यांनी मनाशी बांधलेल्या डावपेचात बरेच बदल करण्याची वेळ येणार आहे.
‘विदर्भ अ‍ॅडव्हांटेज’च्या निमित्ताने नितीन गडकरींचे विश्वासू संदीप जोशी यांनी नागपूरचे खासदार विलास मुत्तेमवार यांच्यावर नेम साधल्याने त्यांच्या विरोधात मुत्तमवारांचे कट्टर समर्थक विलास ठाकरे सध्या राजकीय आखाडय़ात उतरले आहेत. हा संघर्ष अप्रत्यक्षपणे मुत्तेमवार विरुद्ध गडकरी असाच पाहिला जात आहे. महापालिकेच्या अर्थसंकल्पाची धावाधाव, स्थायी समितीची निवडणूक यात नगरसेवक व्यस्त आहेत. जिल्हा परिषदेतील राजकारणात भाजपने शिवसेनेचा गेम केल्याने सेनेचा गट भाजपवर नाराज आहे. राजकीय समीकरणांच्या जुळवाजुळवीच्या धबडग्यात ‘विदर्भ अ‍ॅडव्हांटेज’ होत असल्याने तेथे विदर्भातील लोकप्रतिनिधी कशी एकजूट दाखविणार आणि देशातील नामवंत उद्योगपती आले तर त्यांच्यापुढे काय चित्र निर्माण होणार हादेखील चिंतेचा विषय आहे. विदर्भ अ‍ॅडव्हांटेजच्या आयोजनाचे भव्य चित्र उभे केले जात असताना नागपूरचे खासदार विलास मुत्तेमवार यांची अवस्था पार डावलल्यासारखी झाली आहे. त्यांनी या घडामोडींवर अद्यापही प्रतिक्रिया दिलेली नाही. परंतु, खुद्द मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतलेल्या या आयोजनात त्यांचे नाव दिसलेले नाही.
राष्ट्रवादीच्या शहरातील पदाधिकाऱ्यांनी पूर्ण जोर लावून महिला मेळाव्याला गर्दी जमविली. सुप्रियांच्या मेळाव्यापूर्वी शहरावर पावसाचे सावट होते. परंतु, मेळावा बंदिस्त स्टेडियममध्ये असल्याने आयोजकांना फारशी चिंता नव्हती. अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख, शहराध्यक्ष अजय पाटील, नगरसेविका प्रगती पाटील, नूतन रेवतकर, सलील देशमुख यांनी कार्यकर्ते पणाला लावून गर्दी अपेक्षेइतपत जमेल याची काळजी घेतली. सुप्रियांनीही गर्दीचा आकडा पाहून समाधान व्यक्त केले. राष्ट्रवादीचे विदर्भातील अस्तित्व मर्यादित असले तरी धोकादायक असल्याने भाजपचे मेळाव्यावर खास लक्ष होते.
सुप्रियांच्या महिला मेळाव्याच्या दुसऱ्या दिवशी बहुजन समाजवादी पक्षाच्या सर्वेसर्वा यांच्या जाहीर सभेसाठीच्या गर्दीच्या आकडय़ाचा अंदाज राजकीय वर्तुळातून घेतला जात होता. कस्तुरचंद पार्कवरील मायावतींच्या महागडय़ा सभेला मिळालेल्या यशाने राजकीय धक्के बसले आहेत.
या सभेसाठी ट्रक भरून राज्यभरातून लोकांना आणण्यात आले होते. हा भाग जरी विचारात घेतला तरी मायावतींच्या नावाला राष्ट्रीय पातळीवर असलेल्या वलयातून ही गर्दी जमली होती आणि मायावतींच्या भाषणातील प्रत्येक वाक्याला गर्दीने दिलेला अभूतपर्व प्रतिसाद याबद्दल कोणाचे दुमत नाही. मायावतींच्या सभेने रिपब्लिकन मतांचे समीकरण बदलेल असा सध्याचा राजकीय होरा आहे.
गडकरींचा विजय हा उत्तर नागपुरातून त्यांना किती मतदान होणार यावर बऱ्याच प्रमाण अवलंबून राहणार असल्याने भाजपला ‘की पॉकेट्स’ बरोबरच रिपब्लिकन आणि मुस्लिम वस्त्यांवर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. भाजपच्या हाती असलेल्या महापालिकेने नुकतीच मुस्लिम मुलींसाठी नि:शुल्क संगण प्रशिक्षणाची योजना जाहीर केली आहे. मुस्लिम कबरस्तांनाही जागा दिल्या आहेत.  
नागपुरातील आंबेडकरवादी रिपब्लिकन विचार मंचचे नेते व माजी नगरसेवक जनार्दन मून यांनी मायावतींच्या सभेनंतर एक पत्रक जारी करून त्यांना कस्तुरचंद पार्क मैदानाच्या अगदी बाजूला असलेल्या संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालण्याचा विसर कसा पडला असा जाहीर सवाल करून एक ठिणगी टाकली आहे. राजकीय यशाच्या धुंदीने मायावतींना आंबेडकरांच्या विचारांचाही विसर पडल्याचा आरोप जनार्दन मून यांनी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा