भारतीय जनता पक्ष ‘व्हिजन २०२५’ तयार करीत असून त्यात व्यवहारावर आधारित कर रचनेचा विचार सुरू असल्याची माहिती भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय नेते नितीन गडकरी यांनी बुधवारी सकाळी दिली. भविष्यात शंभर टक्के समाजकारणावर भर देणार असल्याचे ते म्हणाले.
विधान सभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या रविभवनातील बंगल्यात आयोजित पत्रकार परिषदेत गडकरी बोलत होते. एकनाथ खडसे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे, प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्यासह पक्षाचे सर्व आमदार, महापौर अनिल सोले, उपमहापौर जैतुनबी अन्सारी, स्थायी समितीचे अध्यक्ष अविनाश ठाकरे, महापालिकेचे सत्तापक्षनेते प्रवीण दटके, संदीप जोशी, छोटू भोयर प्रामुख्याने उपस्थित होते. भारतीय जनता पक्ष ‘व्हिजन २०२५’ तयार करीत असून सत्तेवर आल्यानंतर विकासदर दोन वर्षांत वाढविणे हा त्यामागील उद्देश असल्याचे गडकरी म्हणाले.
पुणे-नाशिक येथील अर्थक्रांती या संस्थेने व्यवहारावर आधारित कररचना सूचविली आहे. अनेक देशात ती आहे. या कररचनेत प्राप्तिकर, विक्रीकरातून नागरिकांवरील सुटका होणार आहे. देशात कररुपाने १४ लाख कोटी रुपये उत्पन्न मिळते. या नव्या रचनेत व्यवहारावर आधारित कर गोळा केला जाणार आहे. एकदाच कर भरावा लागेल. वारंवार कर भरावे लागणार नाहीत. राष्ट्रीयीकृत बँकांच्या दीड लाख शाखा आहेत. त्या वाढवाव्या लागतील. त्यातून रोजगारही वाढेल. वारंवार कर भरावा लागणार नसल्याने नागरिकांचा जाच होणार नाही. गैरप्रकार होणार नाहीत. पारदर्शी व्यवहार राहील. इन्स्पेक्टर राज राहणार नाही. उत्पन्न ४० लाख कोटी रुपयांपर्यंत वाढेल. यासंदर्भात उद्योजक, सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू आहे. राजकारणाची व्याख्याच आज बदलून गेली आहे. ९० टक्के समाजकारण व १० टक्के राजकारण केले जावे. शंभर टक्के समाजकारण करणाऱ्यास जनताही निवडून देते. त्यामुळेच शंभर टक्के समाजकारण करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Story img Loader