लातूर तालुक्यात शेतीसाठी पाणी नाही, जनावरांना चारा नाही, गावात पिण्याला पाणी नाही, अशी भयंकर स्थिती असल्यामुळे प्रशासनाने तत्काळ तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा, अशी मागणी करणारे निवेदन भाजपतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
रमेश कराड, डॉ. गोपाळराव पाटील, ओमप्रकाश गोडभरले, सुधीर धुत्तेकर, ईश्वर गुडे आदींच्या शिष्टमंडळाने हे निवेदन दिले. प्रशासनाच्या वतीने चुकीची पीक आणेवारी नोंदवण्यात आली. त्याचा तालुक्यातील लोकांना फटका बसला. शेतमजुरांच्या हाताला काम नाही. वाळू उपसा बंद असल्याने व पाणीटंचाईमुळे बांधकामे बंद असल्यामुळे गवंडी व मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. तालुक्यातील मुरुड हे सर्वात मोठे गाव आहे. जनावरांना चारा नसल्यामुळे त्यांची मातीमोल भावाने विक्री होत आहे व पशुधन थेट कत्तलखान्याकडे जात आहे. प्रशासनाने मंडळनिहाय चारा छावण्या सुरू कराव्यात. मजुरांच्या हाताला काम मिळण्यासाठी रोजगार हमी योजनेंतर्गत कामे द्यावीत, कामावरील मजुरी वाढवून द्यावी तसेच तालुक्यातील लोकांना स्थलांतराची वेळ येणार नाही, याची काळजी प्रशासनाने घ्यावी. शेतकऱ्यांसाठी विहिरीची योजना सुरू करावी. प्रशासनाने या बाबतीत लक्ष घातले नाही, तर भाजपा तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा देण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा