शिवसेनेचा टीकेचा रोख चुकीचा आहे. जिंकणाऱ्या पक्षावरच नेहमी टीका केली जाते. मात्र भाजप एक चांगला कार्यक्रम घेऊन जनतेसमोर जात आहे, पण तरीही जे लोक टीका करत आहेत, त्यांना देव सुबुद्धी देवो, असा टोला केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांनी लगावला. ठाणे शहरातील भाजप उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनासाठी जावडेकर ठाण्यात आले होते.   कॉंग्रेस-राष्ट्रवादी हे पक्ष आता वेगळे झाले असल्याने   एकमेकांवर दोषारोप करीत आहेत. मात्र दोघांनीही महाराष्ट्राला लुटण्याचे पाप केले असून त्यातून त्यांची आता सुटका नाही, असे जावडेकर म्हणाले. या निवडणुकीत भाजपची लढत दु:शासनाबरोबर आहे. लोक विचार करून मतदान करतील. त्यामुळे भाजपची मते विभागली जाणार नसल्याचा दावा त्यांनी केला.  
शिवसेना उपनेते अनंत तरे यांच्या उमेदवारीवरून झालेल्या गोंधळावर बोलताना, तो भूतकाळ असल्याचे सांगत त्यांनी या विषयावर प्रतिक्रिया देणे टाळले. यावेळी ठाण्यातील भाजपचे उमेदवार संजय केळकर, अशोक भोईर आणि संदीप लेले उपस्थित होते.

Story img Loader