दक्षिण-पश्चिम मतदारसंघावर सलग दुसऱ्यांदा वर्चस्व कायम राखत भाजपने त्यांचा गड कायम राखला आहे. २००९ मधील विधानसभा निवडणुकीत भाजपचे देवेंद्र फडणवीस यांना शह देण्यासाठी काँग्रेसने विकास ठाकरे यांना हा मतदारसंघ नको असतानाही फडणविसांसमोर उभे केले होते. विकास ठाकरे यांच्या नावासमोर तेव्हा माजी महापौर नावाचे वलय होते आणि काँग्रेसचे नागपुरातील मान्यवर नेता म्हणून त्यांची ख्याती असताना फडणविसांना त्यांची सर्व शक्ती पणाला लावावी लागली. त्या निवडणुकीत फडणवीस ८९ हजार २५८ मतदारांचा विश्वास जिंकण्यात यशस्वी ठरले, तर विकास ठाकरे यांना ६१ हजार ४८३ मतदारांनी पसंती दिली. तब्बल २७ हजार ७७५ मतांनी फडणवीस यांनी हा गड काबीज केला. २०१४च्या विधानसभा निवडणुकीत फडणविसांसमोर काँग्रेसने प्रफुल्ल गुडधे यांच्या रूपाने नवख्या उमेदवाराला उभे केले.
महापालिकेतील ते अभ्यासू नगरसेवक असले तरी राज्यपातळीवरील राजकारणाचा त्यांना अनुभव नाही. त्या तुलनेत फडणविसांना संभाव्य मुख्यमंत्रीपदाचे मिळालेले वलय गुडधे पाटलांच्या कमजोरीस आणखी कारणीभूत ठरले. गुडधे पाटील सर्व शक्तीनिशी निवडणुकीत उतरले असले तरी प्रभागाव्यतिरिक्त बाहेर त्यांचा फारसा प्रभाव नव्हता. त्यामुळे भाजपला त्यांचा परंपरागत गड सहजपणे कायम राखता आला. हा गड पूर्वी पश्चिममध्ये असतानाही भाजपचेच या गडावर वर्चस्व होते. पश्चिममधून निघून दक्षिण-पश्चिम असा नवा मतदारसंघ म्हणून उदयास आल्यानंतरही भाजप आणि फडणवीसांनी त्यांची सत्ता कायम राखली.