गुंडापुंडांची फौज उतरवून दहशत निर्माण करता येते.. निवडणूक जिंकता येत नाही, हाच धडा कोपरी परिसरातील मतदारांनी ठाण्यातील सर्वच राजकीय पक्षांना या ठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने घालून दिला आहे. राज्याचे उद्योगमंत्री यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे रवींद्र फाटक यांनी अतिशय प्रतिष्ठेच्या केलेल्या या पोटनिवडणुकीत नवी मुंबई, कळवा, ठाणे परिसरातील गुंडांची फौजच प्रचारात उतरविण्यात आली होती. खुनासारखे गंभीर आरोप असलेले आरोपी पोलिसांच्या डोळ्यादेखत या प्रभागात आपल्या समर्थकांसह दहशत माजविताना दिसत होते. गुंडांचा वावर नको तितका वाढल्यामुळे कोपरीकर गेले काही दिवस कमालीचे अस्वस्थ होते. याचा मोठा फटका काँग्रेस उमेदवार अॅड.अरुणा भुजबळ यांना बसल्याचे सोमवारी मतमोजणीनंतर दिसून आले. कोपरीतील मतदारांनी त्यांचा तब्बल तीन हजार मतांनी पराभव करताना ठाण्यातील राजकीय वर्तुळात सुरू झालेल्या ‘भाईगिरी’च्या राजकारणाचे ‘फाटक’ एकप्रकारे बंद केल्याची प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात उमटू लागली आहे.
ठाणे महापालिकेतील पक्षीय संख्याबळ लक्षात घेता कोपरी येथील पोटनिवडणूक सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची केली होती. दीड वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत या प्रभागातील एका गटात राष्ट्रवादीचे लक्ष्मण टिकमानी तर दुसऱ्या गटातून भारतीय जनता पक्षाच्या चांदनी दुलानी निवडून आल्या होत्या. मात्र आरक्षणाच्या मुद्दय़ावरून दुलानी यांचे नगरसेवक पद रद्द झाले आणि येथे पोटनिवडणूक लागली. मुंब्रा परिसरात होत असलेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचा विजय निश्चित मानला जात होता. त्यामुळे महापौर पद टिकवायचे असेल तर युती आणि आघाडीला कोपरीत विजय आवश्यक होता. त्यामुळे शिवसेनेने कोपरी येथील पोटनिवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आणि भाजप उमेदवारासाठी सर्व ताकद पणाला लावली. हा प्रभाग एकनाथ िशदे यांच्या विधानसभा मतदारसंघात मोडतो. त्यामुळे काँग्रेसचे विधानसभेचे इच्छुक उमेदवार रवींद्र फाटक यांनीही ही निवडणूक प्रतिष्ठेची केली. एका प्रभागापुरती होत असलेल्या या निवडणुकीला थेट त्यामुळे विधानसभेसारखा ज्वर चढला. मोठय़ा संख्येने सुक्षिशित मराठी आणि सिंधीबहुल मतदारांचा भरणा असलेल्या या प्रभागात दोन आठवडय़ांपासून गंभीर गुन्ह्य़ांची नोंद असलेल्या गुंडांचा वावर वाढला होता. काँग्रेस उमेदवाराचा प्रचार करतो आहोत असे सांगणाऱ्या या गुंडांनी प्रचारादरम्यान राष्ट्रवादीच्या एका नगरसेवकाला बुकलले. त्यामुळे निवडणुकांच्या तोंडावर आघाडीत मोठी दरी निर्माण झाली. कोपरीतील सर्वसामान्य मतदारांशी काही देणे-घेणे नसताना पोलिसांच्या डोळ्यांदेखत या ठिकाणी गुंडांचे टोळके फिरताना दिसायचे. नारायण राणे, नितेश राणे यांच्या छबीशेजारी आपले छायाचित्र लावून बॅनरबाजी करणारे काही गुंडांचे कोपरी परिसरात अक्षरश: थैमान सुरू होते. एका पक्षाच्या कार्यालयात अड्डा जमवायचा, तेथे रस्ते अडवून गाडय़ा उभ्या करायच्या, स्थानिक कार्यकर्त्यांना दमबाजी करायची असे ‘उद्योग’ येथे पोलिसांना वाकुल्या दाखवत सुरू होते. त्यामुळे कोपरीतील मतदार अस्वस्थ होता. तणावाच्या वातावरणामुळे मतदानाच्या दिवशी ५० टक्क्य़ांहून अधिक मतदारांनी घरीच बसणे पसंत केले. दुसरीकडे शिवसेना-भाजपच्या गोटात मात्र नियोजनबद्ध प्रचार सुरू होता. दीड वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत भाजपच्या चांदनी दुलानी जेमतेम ३०० मतांच्या फरकाने निवडून आल्या होत्या. यावेळी भाजपने ३२०० मतांची आघाडी घेत विजय मिळवला. युतीच्या सांघिक प्रयत्नांचा हा विजय असला तरी दादागिरी आणि झुंडशाहीचे ‘फाटक’ कोपरीकरांनी बंद पाडल्याची प्रतिक्रिया आता उमटू लागल्या आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी यातून बोध घ्यावा, असाच हा निकाल आहे.
भाजपचा दणदणीत विजय
गुंडापुंडांची फौज उतरवून दहशत निर्माण करता येते.. निवडणूक जिंकता येत नाही, हाच धडा कोपरी परिसरातील मतदारांनी ठाण्यातील सर्वच राजकीय पक्षांना या ठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने घालून दिला आहे.
First published on: 03-09-2013 at 08:00 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp won elections