पहिली फेरी जाहीर होताच ‘वारे कमळ आ गया कमळ’च्या घोषणा देणे सुरू झाले. चौथी फेरी झाली तेव्हा भाजपचे उमेदवार कृष्णा खोपडे यांनी काँग्रेसचे उमेदवार अॅड. अभिजित वंजारी यांच्या विरुद्ध १०,१६५ मतांची आघाडी घेताच ध्वनिक्षेपकावर भाजप कार्यकत्यरंच्या एकच जल्लोषाचा आवाज आला. अशा पाचव्या, सहाव्या, अशा तेराव्या फेरीपर्यंत आघाडी घेत अखेरच्या चौदाव्या फेरीत पूर्व नागपुरातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार कृष्णा खोपडे यांनी प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार अॅड. अभिजित वंजारी यांचा ४८,६१४ मतांनी पराभव केला.
अखेरच्या चौदाव्या फेरीत काँग्रेसचे वंजारी यांना ५०,५२२, भाजपचे कृष्णा खोपडे यांना ९९,१३६, शिवसेनेचे अजय दलाल यांना ७,४८१, बसपचे १२,१६४ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ८,०६१ तर बाकीच्या उमेदवारांनी जवळपास ९१ ते १३३४च्या जवळपास मते घेतली. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार कृष्णा खोपडे ४८,६१४ मतांनी विजयी झाले. विजयी झाल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी हनुमाननगर क्रीडा चौकातील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयासमोर गुलाल उधळून, डिजे वाजवून व फटाक्याची आतिषबाजी करून एकच जल्लोष केला. यावेळी मतदारांनी कोणालाही मतदान न करण्याचे (नोटा) १.०५१ मतदारांनी प्रयोग केला आहे. ५४-पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघातील एकूण मतदार ३,२७,२८२, वैध मते १,८३,४६१, नोटा १०५१, अवैध मते १८९ व टेंडर मते १२ असे आहे.
विकास कामांवरच मतदारांचा कौल -खोपडे
विधानसभेच्या २००९ च्या निवडणुकीत ३२ हजारच्या वर मतांची आघाडी घेऊन विजयी झालो होतो. लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरी यांना ६६ हजारांच्या वर आघाडी घेतली होती. यावेळी विरोधकांनी खालच्या पातळीवर प्रचार केला. पूर्व नागपूर गेल्या पाच वर्षां अगोदर एका खेडय़ासारखे शहर होते. गत पाच वर्षांत अनधिकृत वस्त्यांमध्ये विकासाचे कामे केली. विकासाच्या कामावरच मतदारांनी मला मते दिली. माजी मंत्री सतीश चतुर्वेदी हरण्याच्या भीतीने हा मतदारसंघ सोडून अॅड. अभिजित वंजारी यांना या मतदारसंघात पाठवून तेली समाजाच्या विरुद्ध तेली समाजाचा उमेदवार दिला. पण जातीच्या आधारावर कोणीही मतदान करीत नाही. यामुळे मतदारांनी त्यांना नाकारले. काँग्रेसचे माजी खासदार विलास मुत्तेमवार व त्यांच्या कार्यकर्त्यांना चिंतन करण्याची गरज आहे, असे विजयी उमेदवार कृष्णा खोपडे यांनी सांगितले.
‘उपराजधानी भाजपचा गड’
भारतीय जनता पक्षाचा शहर अध्यक्ष झाल्यानंतर २०१२ ला नागपूर महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आली. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय नेते नितीन गडकरी यांचा दणदणीत विजय झाला. त्यानंतर आता उपराजधानीतील विधानसभा निवडणुकीतील सहाही भाजपचे उमेदवार विजयी झाले. हे माझ्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात झाल्याचे मला अभिमान आहे, असे शहराध्यक्ष व आमदार कृष्णा खोपडे यांनी सांगितले. हे सगळे यश पदाधिकारी व कार्यकर्त्यांमुळेच मिळत आहे.
सहाही विधानसभा निवडणुकीतील यश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट आणि मतदारांनी विकासाच्या कामवरच मतदान केले असल्याचे कृष्णा खोपडे यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा