शहराच्या विकासासाठी ५०० कोटींची मदत जाहीर करा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी स्मारकासाठी त्वरित निधी द्या, शहर वाहतुकीसाठी मोरभवनाची जागा महापालिकेच्या स्वाधीन करा, शहरातील झोपडट्टीधारकांना मालकी पट्टे द्या, नागपूर सुधार प्रन्यासमध्ये अडकलेले लेआऊट आरक्षण मुक्त करा, या प्रमुख मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्य़ातील भाजपच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यावर बसून ठिय्या आंदोलन केले.
 या आंदोलनामध्ये नागपूर जिल्हा भाजपचे शहराध्यक्ष कृष्णा खोपडे, आमदार सुधाकर देशमुख, आमदार विकास कुंभारे, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार सुधीर पारवे, आमदार विजय घोडमारे सहभागी झाले होते.
या मागण्यांसाठी शासनाकडे निवेदने व पत्रव्यवहार करण्यात आला. परंतु शासनाने आश्वासने देऊन त्याची पूर्तता केली नसल्याकडे आमदार सुधाकर देशमुख यांनी पत्रकारांचे लक्ष वेधले. या अधिवेशनात या मागण्यांची पूर्तता झाली नाही तर तीव्र आंदोलन करण्याशिवाय आमच्याकडे पर्याय उरणार नाही, असेही ते म्हणाले.
‘अण्णा हजारेंच्या आंदोलनाची दखल घ्या’
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे लोकपाल विधेयक संसदेत पारित करण्याच्या मागणीसाठी गेल्या तीन दिवसांपासून आंदोलन करीत आहेत. उपोषणामुळे त्यांची प्रकृती ढासळत आहेत. त्यांचे वयोमान बघता सरकारने एक प्रतिनिधी त्यांच्याकडे पाठवावा व त्यांच्या भावनांचा आदर करावा, असे मत शिवसेनेचे आमदार बाळा नांदगावकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. अण्णा हजारे यांच्याबद्दल महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात आदर आहे. शासनाने कोणताही अहंकार न ठेवता त्यांचा सन्मान राखावा, असेही ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा