‘देवेनभाऊ आगे बढो, हम तुम्हारे साथ है..’ चौथी फेरी झाली आणि कार्यकर्त्यांमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीसांच्या नावाचा गजर सुरू झाला. सुरुवातीला ढोल, मग ताशा, थोडय़ावेळाने फटाके आणि नंतर या सातव्या फेरीनंतर या तिन्हीचा गजर दीक्षाभूमीसमोर सुरू झाला. नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघात काँग्रेसचे प्रफुल्ल गुडधे पाटील आणि भाजपचे देवेंद्र फडणवीस यांच्यात सामना १५ ऑक्टोबरलाच रंगला होता, पण १९ ऑक्टोबरला श्रद्धानंदपेठेतील कुर्वे न्यू मॉडेल हायस्कूलमध्ये लागणाऱ्या या सामन्याच्या निकालाकडे सर्वच महाराष्ट्राचे लक्ष होते. फडणविसांकडे भावी मुख्यमंत्री म्हणून पाहण्यात येत असल्याचा परिणाम या परिसरातही दिसून आला. सकाळी ८.३० वाजेपासूनच हौसे, नवसे आणि गवस्यांचा लोंढा इकडे वळायला लागला होता. राजकारण कळणाऱ्या आणि न कळणाऱ्या अशा दोन्ही गटात निकालाचे फड रंगायला लागले होते. पहिल्या तीन फेऱ्यापर्यंत सारे काही शांत होते, पण चौथ्या फेरीनंतर भगव्या टोपी आणि भगव्या झेंडय़ासह जल्लोषाची सुरू झालेली हलकी सुरुवात सातव्या फेरीनंतर वाढली. नवव्या फेरीचा निकाल घोषित होताच निकाल केंद्रातून नगरसेवक संदीप जोशी, आशिष फडणवीस कार्यकर्त्यांसह बाहेर निघाले आणि बाहेर उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांच्या जल्लोषात सहभागी झाले. विशेष म्हणजे काँग्रेसच्या प्रफुल्ल गुडधे यांच्या कार्यकर्त्यांची वर्दळ मात्र याठिकाणी जाणवली नाही.