वर्धा जिल्ह्य़ात ओला दुष्काळ जाहीर करावा या व अन्य मागण्यांसाठी भाजप नेत्यांनी गेल्या पाच दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू केले असून या आंदोलनाच्या समर्थनार्थ उद्या बुधवारी वर्धा बंद पुकारण्यात आला आहे.     
या जिल्ह्य़ात ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयाची मदत, जिल्हा बंॅकेतील ठेवी परत मिळाव्या, अशा प्रमुख मागण्यांसाठी माजी खासदार सुरेश वाघमारे, भाजपचे जिल्हा परिषदेतील गटनेते श्याम गायकवाड, सदस्य राणा रणनवरे, राजू बकाने, प्रभाकर बरडे, चंद्रशेखर वंजारी हे प्रमुख नेते उपोषणास बसले आहेत. यापैकी वंजारी, गायकवाड व बरडे यांना आज प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. हे उपोषण मागे घ्यावे म्हणून पालकमंत्री राजेंद्र मुळक यांनी उपोषण मंडपास सोमवारी भेट देऊन शासनाची भूमिका मांडली. परंतु, त्यांच्या उत्तराने समाधान न झालेल्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांनी चर्चा करून मागण्याबाबत होकार कळवावा तेव्हाच उपोषण मागे घेऊ, असे स्पष्ट केले. दरम्यान, आमदार सुरेश देशमुख, नागो गाणार, दादाराव केचे, शेतकरी नेते विजय जावंधिया व किशोर तिवारी, रिपाई नेते विजय आगलावे, शिवसेना जिल्हाप्रमुख रवी बालपांडे, भाजपचे डॉ. उपेंद्र कोठेकर, राज्य प्रवक्ते गिरीश व्यास, अरविंद शहापूरकर यांनी उपोषणकर्त्यांना भेटून पाठिंबा दिला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार देवेंद्र फ डणवीस उद्या बुधवारी उपोषणकर्त्यांना भेटणार आहेत. याच दिवशी भाजपने वर्धा बंदचे आवाहन केले असून वर्धा व्यापारी संघ, रिपाई, मनसे, शेतकरी संघटना, राज्य किसान सभा, प्रहार, इंडिया अगेंस्ट करप्शन यांनी बंदला समर्थन दिले आहे. जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे यांनी उद्याच्या बंदमध्ये सर्वानी सहभागी होऊन शेतकऱ्यांच्या लढय़ास पाठिंबा देण्याचे आवाहन केले.     
आज माजी आमदार रामदास तडस यांनी उपोषणाच्या समर्थनार्थ निघालेल्या पदयात्रेला झेंडा दाखवला. देवळी-पुलगाव परिसरातल्या ६५ खेडय़ांमधील पूरग्रस्त या पदयात्रेत सहभागी झाले आहेत. सेलसुरा, सालोड, सावंगी याठिकाणी पदयात्रेचे स्वागत करण्यात आले. यावेळी बोलतांना तडस म्हणाले की, पुरामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप दिलासा मिळालेला नाही. चुकीच्या पध्दतीने सव्‍‌र्हेक्षण होत आहे. सर्वत्र नापिकीची स्थिती आहे. पुरामुळे घरदारे वाहून गेली असून स्वयंसेवी संस्थांच्या भरवशावर अनेकांची गुजराण होत आहे. राज्यकर्ते मात्र उदासीन असल्यानेच भाजपतर्फे  तीव्र आंदोलन छेडले जात आहे. मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण चालू राहणार असून विदर्भात या आंदोलनाची तिव्रता दिसेल, असे मत रामदास तडस यांनी व्यक्त केले. उद्या, बुधवारी प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फ डणवीस यांच्या भेटीनंतर आंदोलनास नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते. उपोषणाच्या समर्थनार्थ कामगार संघटनेतर्फे  मजदूर संघाचे नेते मिलिंद देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली दुपारी दोन वाजता शिवाजी चौकातून रॅली निघणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा