भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे व माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी माध्यमांसमोर कितीही गळय़ात गळे घालत असले, तरी गावपातळीवरील पक्षाचे कार्यकत्रे गटबाजीच्या फे ऱ्यात पुरते अडकल्याचे चित्र लातूर जिल्हय़ात तयार झाले आहे. गटा-तटाच्या राजकारणात जिल्हय़ातील भाजपाचे कमळ गटांगळय़ा खात आहे.
सहा महिन्यांपूर्वी जिल्हाध्यक्षपदी प्रा. नागनाथ निडवदे यांची निवड जाहीर करण्यात आली. निडवदे यांच्या निवडीमागे गडकरी गट असल्याचे लक्षात घेऊन मुंडे गटाने त्यांच्या निवडीला स्थगिती दिली व पुढील कार्यकारिणी जाहीर करण्यासाठी थांबण्यास सांगितले. सहा महिने जिल्हा कार्यकारिणीचे घोंगडे भिजत राहिले. दरम्यानच्या काळात प्रदेशाध्यक्षपदाचा वाद उफाळला. तो सुटल्यानंतर लातूर जिल्हय़ातील निर्णयप्रक्रिया गतिमान होईल, असे वाटले होते. भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे लातूर शहरात नुकतेच एका कार्यक्रमानिमित्त येऊन गेले. त्यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात मुंडे गटाची स्वाभाविक अनुपस्थिती होती. प्रदेश सरचिटणीस संभाजी पाटील निलंगेकर यांचा वरचष्मा जिल्हय़ात असल्याचे चित्र तावडे यांच्या स्वागत कमानी निमित्ताने दिसून आले.
तावडे मुंबईला पोहोचताच जिल्हाध्यक्ष निडवदे यांनी जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली. कार्यकारिणी जाहीर होताच मुंडे समर्थक व प्रदेश उपाध्यक्ष गोिवद केंद्रे यांच्या पुढाकारात दुसरा गट सक्रिय झाला व त्यांनी विद्यमान अध्यक्षांनी जाहीर केलेली जिल्हा कार्यकारिणी आपल्याला मान्य नाही. त्यामुळे जिल्हाध्यक्षापासून सर्वच पदाधिकारी बदलण्याची प्रक्रिया सुरू केली. निलंगेकर यांच्यासोबत उदगीरचे आमदार सुधाकर भालेराव, तर गोिवद केंद्रेंसोबत प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, रमेश कराड व टी. पी. कांबळे असे चित्र निर्माण झाले. प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस हे मुंडे समर्थक म्हणून ओळखले जातात. जिल्हाध्यक्षांनी जाहीर केलेल्या कार्यकारिणीला त्यांनी स्थगिती दिली. त्यात प्रदेशाध्यक्षांचे पत्र जिल्हाध्यक्ष निडवदे या नावाने आल्यामुळे निडवदे हेच जिल्हाध्यक्ष, हे सिद्ध करण्यात गडकरी गट यशस्वी झाला, तसेच निडवदे यांनी जाहीर केलेल्या कार्यकारिणीला स्थगिती देण्यात मुंडे गट यशस्वी झाला आहे. कोणी कोणावर मात केली, हे सांगण्यातच भाजपाचे पुढारी मग्न आहेत. त्यांना पक्ष वाढविण्यापेक्षा आपला गट मजबूत होण्यातच अधिक रस असल्याचे दिसून येत आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा उमेदवार अवघ्या साडेसहा हजार मतांच्या फरकाने पराभूत झाला. आता भाजपाला विजय मिळण्याची शक्यता वाढली आहे. मात्र, पक्षपातळीवर ‘गाढवांचा गोंधळ अन् लाथांचा सुकाळ’ असे चित्र आहे. कदाचित राज्यातील महायुतीत लातूरची जागा रिपाइंला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजपाच्या लोकसभा निवडणुकीच्या राष्ट्रीय प्रचारप्रमुखपदी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आहेत. त्यांच्या संभाव्य दौऱ्यात लातूर मतदारसंघाचेही नाव आहे. पक्षाची संघटनात्मक स्थिती चिंतेची असेल, तर त्यांचा लातूर दौरा होईल की नाही हेही सांगणे आता अवघड आहे. भाजपातील अंतर्गत लाथाळय़ांमुळे काँग्रेसची मंडळी मात्र आतून चांगलीच सुखावली आहे. काँगेस योग्य उमेदवाराच्या शोधात आहे. त्यामुळे भाजपावर पुन्हा मात करण्यासाठीचे त्यांचे आडाखे यशस्वी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.