गेले काही दिवस डोंबिवलीमधील पेंढरकर महाविद्यालयात ‘पायाभूत सुविधा विकास फंडा’च्या नावाखाली सुरू असलेल्या अतिरिक्त शुल्क वसुलीप्रकरणी शिवसेनेच्या युवा सेनेवर मात करीत भाजपने आपला आवाज बुलंद केला आहे. शिवसेनाप्रणित ‘युवा सेने’ने संस्थेशी केलेल्या वाटाघाटींनंतर संस्थेने बाराशे रुपयांऐवजी विद्यार्थ्यांकडून ६०० रुपये घेऊ, अशी तडजोड केली. पण, त्यानंतर भाजपप्रणित विद्यार्थी आघाडीने शिष्टाई करीत त्याही पुढे जात विद्यार्थ्यांकडून एकही पैसा घेणार नाही, असे संस्थेकडून वदवून घेत या संपूर्ण वादात सरशी घेतली आहे.
‘शिक्षण प्रसारक मंडळा’तर्फे चालविले जाणारे हे महाविद्यालय गेले काही दिवस विद्यार्थ्यांकडून बळजबरीने केल्या जाणाऱ्या जादा शुल्क वसुलीच्या आरोपामुळे गाजत आहे. संस्थेला आपल्या परिसरात नवीन शाळा बांधायची आहे. शाळेच्या इमारतीसाठी महाविद्यालयातील सुमारे पाच हजार २०० विद्यार्थ्यांकडून ही शुल्क वसुली करण्यात येत होती. त्यासाठी संस्थेने प्रत्येक विद्यार्थ्यांला १२०० रुपये भरा, अन्यथा पुढल्या शैक्षणिक वर्षांला प्रवेश देणार नाही, अशी अडवणुकीची भूमिका घेतल्याने विद्यार्थी-पालकांमध्ये असंतोषाचे वातावरण होते.
दरम्यानच्या काळात युवा सेना, विद्यार्थी आघाडी, मनसेप्रणित ‘महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना’ आदी विद्यार्थी संघटनांनी या वादात उडी घेत आपापल्या परीने संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर देसाई यांच्याशी चर्चा सुरू केली. युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी देसाई यांची भेट घेऊन पैसे कमी करण्याची मागणी केली. त्यावर संस्थेने यापुढे ६०० रुपये घेतले जातील, असे स्पष्ट केले. या बैठकीनंतर थोडय़ाच वेळेत युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी आपल्या ‘फेसबुक’वर युवासेनेने विद्यार्थ्यांना कसा दिलासा मिळवून दिला, याची ‘पोस्ट’ टाकून पाठ थोपटून घेतली.
यानंतर विद्यार्थी आघाडीचे पदाधिकारी देसाई यांना भेटले. या चर्चेनंतर काय झाले कुणास ठाऊक देसाई यांनी त्यांच्या कार्यालयाबाहेर थांबलेल्या विद्यार्थ्यांसमोर, ‘ज्यांची इच्छा असेल त्यांनीच पैसे भरावे, यापुढे विद्यार्थ्यांना एकही पैसा भरण्याची बळजबरी करणार नाही,’ असे जाहीर करून टाकले. यामुळे या संपूर्ण वादात भाजपच्या विद्यार्थी आघाडीने सरशी घेतल्याची चर्चा विद्यार्थ्यांमध्ये आहे. याबाबत मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर देसाई यांच्याशी प्रतिक्रियेकरिता संपर्क साधला असता, ‘ज्यांना या प्रश्नाचे राजकारण करायचे त्यांनी खुशाल करावे. मला कॉलेज चालवायचे असून मला या प्रकरणी आणखी काही बोलायचे नाही,’ असे सांगून संभाषण संपविले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा