जिल्हा शेळीमेंढी पालन सहकारी संघाच्या देऊळगाव सिद्धी (ता. नगर) येथील कत्तलखान्यावर भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आज हल्लाबोल करण्यात आला. यात प्रकल्पातील यंत्रसामग्रीची मोडतोड करत, घोषणा देत प्रकल्प बंद करावा अशी मागणी करण्यात आली.
शेळीमेंढी पालन प्रकल्प असलेल्या या ठिकाणी गायबैलांचेही मांस कापले जाते असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे हा अचानक हल्लाबोल करण्यात आला. सुवेंद्र गांधी, नगरसेवक नितिन शेलार, दिलीप भालसिंग, दादा बोठे, तुषार पोटे, गोकूळ पठारे, अमोल सुडके, राजू घोरपडे, बंटी ढापसे तसेच नगर शहर व तालुक्यातील कार्यकर्ते मोठय़ा संख्येने प्रकल्पाजवळ जमा झाले. संचालक पांडूरंग पाटील तुतारे यावेळी उपस्थित होते. त्यांनी तसेच प्रकल्पातील कर्मचाऱ्यांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.
चर्चा सुरू असतानाच काहीजण अचानक प्रकल्पात घुसले व त्यांनी मोडतोड सुरू केली. बरीच यंत्रसामग्री मोडण्यात आली. नंतर सर्वजण प्रकल्पाच्या बाहेरच ठाण मांडून बसले. दरम्यान कोणीतरी नगर तालुका पोलिसांना याची माहिती दिली. लगेचच सहायक पोलीस निरीक्षक राहुल पाटील तिथे आले. त्यांनी कार्यकर्त्यांना शांत केले. थोडय़ा वेळाने पोलीस उपअधीक्षक (शहर) शाम घुगे हेही तिथे हजर झाले. तहसीलदार राजेंद्र थोटे यांनीही घटनास्थळाला भेट दिली. आंदोलकांनी त्यांच्याजवळ हा कत्तलखाना बंद करावा अशी मागणी केली.
संचालक अशोक काळे यांनी सांगितले की याठिकाणी फक्त शेळीमेंढी यांचीच कत्तल केली जाते. गायबैलांच्या मांसाची फक्त साठवणूक केली जाते. त्यासाठी स्वतंत्र कोल्डस्टोअरेज आहे. त्याची कत्तल येथे केली जात नाही. आंदोलकांनी चुकीच्या माहितीवर आंदोलन केले आहे असे ते म्हणाले. पोलिसांनी लगेचच पंचनामा तसेच जाबजबाबाचे काम सुरू केले. रात्री उशिरापर्यंत संचालकांची आंदोलकांविरूद्ध तर आंदोलकांची संचालकांच्या विरूद्ध फिर्याद नोंदवण्याचे काम नगर तालुका पोलीस ठाण्यात सुरू होते. गुन्हाही उशिरापर्यंत दाखल झालेला नव्हता.

Story img Loader