राज्यातील इतर मागासवर्गीय (ओबीसी), भटक्या व विमुक्त (व्हीजेएनटी) विद्यार्थ्यांची दोन वर्षांपासून थकित असलेली शिष्यवृत्ती मिळावी, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने ४ डिसेंबरपासून नागपुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा आमदार देवेंद्र फडणवीस यांनी केली.
गेल्या दोन वर्षांपासून राज्यातील ‘ओबीसी’ व ‘व्हीजेएनटी’ विद्यार्थ्यांना ११०० कोटी रुपयांची शिष्यवृत्ती राज्य सरकारने वितरित केलेली नाही. शिष्यवृत्तीअभावी या विद्यार्थ्यांवर शिक्षण अर्धवट सोडण्याची वेळ आलेली आहे. या गंभीर विषयाबाबत राज्य सरकार संवेदनशील नाही. या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी उपलद्ध करून देण्यासाठी तत्कालीन वाजपेयी सरकारने सुरू केलेली ही महत्त्वाकांक्षी योजना शिष्यवृत्ती वितरणात विलंब करून हळूहळू बंद करण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोपी आमदार फडणवीस यांनी केला. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीबाबत सरकारवर दबाव निर्माण करून ‘ओबीसी’ व ‘व्हीजेएनटी’ विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देऊ, असा दावा त्यांनी केला.
राज्य सरकारने ‘ओबीसी’ व ‘व्हीजेएनटी’ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तातडीने वितरित करावी, शिष्यवृत्तीचे नवे दर आणि बी.बी.ए., बी.सी.ए. , बी.सी.सी.ए. आणि इतर नवीन अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्यासंबंधी केंद्र सरकारने ११ ऑगस्ट २०११ रोजी राज्याला कळविलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी, ओबीसीची संपन्न गटाची उत्पन्न मर्यादा ७ लाख रुपये करण्यात यावी, ईबीसी सवलतीसाठी उत्पन्न मर्यादा ४ लाख, ५० हजार रुपये करावी, आदी मागण्या भाजयुमोने केल्या आहेत.
ठिय्या आंदोलनाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्यासाठी प्रवीण दटके, बंटी कुकडे, अविनाश खळतकर यांच्या नेतृत्वाखाली सर्व महाविद्यालयांमध्ये संपर्क साधण्यात येईल. शिवाणी दाणी, निधी कामदार, स्नेहल कुचनकर यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थिनींशी संपर्क साधण्यात येईल. शिष्यवृत्तीबाबत तक्रार अर्ज व ई-स्कॉलरशिप फॉर्म भरण्याची सुविधा आंदोलनाच्या ठिकाणी युवा मोर्चाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात येईल. आमदार कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, सुधाकर देशमुख, चंद्रशेखर बावनकुळे, विजय घोडमारे या आंदोलनाला उपस्थित राहणार आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी, विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे व विनोद तावडे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, आमदार नाना पटोले आंदोलनस्थळी भेट देणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा