जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बहुचर्चित शिपाईभरतीतील कथित भ्रष्टाचाराच्या विरोधात ‘ब्लॅक गॅझेट’ प्रसिध्द करण्याचा इशारा केजरीवाल प्रणित राजकीय पक्षाने दिला आहे. दिवाळीत नर्कचतुर्थीच्या दिवशी पहाटे बँक संचालकांच्या प्रतिमांचेही दहन करण्यात येणार असल्याची माहिती वकील कारभारी गवळी यांनी दिली.
जिल्हा बँकेत सध्या शिपायांच्या ७३ जागांसाठी भरतीची प्रक्रिया सुरू आहे. बँकेचे ज्येष्ठ संचालक तथा ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनीच या भरतीला आक्षेप घेत विविध मुद्दे उपस्थित केल्याने खळबळ उडाली आहे. गवळी यांनी यासंदर्भात प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, या जागा पाच ते सात लाख रूपयांना विकल्या जात आहेत. ही गोष्ट कदापि सहन करणार नाही. बँकेने सन ८३ मध्ये ५८३ जागांची भरती केली होती. त्याही वेळी खुलेअाम भ्रष्टाचार झाला होता. आताही तसाच प्रकार सुरू आहे. जुन्या पिढीतील दिग्गज नेत्यांनी या बँकेला देशात प्रतिष्ठा मिळवून दिली. मात्र आता त्याची धुळधाण चालू आहे.
या गोष्टींचा निषेध करून या भरतीला विरोध करण्यासाठी नर्कचतुर्थीच्या दिवशी पहाटे संचालकांच्या प्रतिमांचे दहन करण्यात येणार आहे. तसेच ‘ब्लॅक गॅझेट’द्वारे या गैरप्रकारातील बारकावे तपशीलाने लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न आहे असे गवळी यांनी सांगितले. पक्षाच्या या बैठकीला नाथा आल्हाट, संजय आल्हट, वंदना देठे, किशोर गायकवाड आदी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा