आतापर्यंत थिएटरच्या बाहेर रेंगाळणारा चित्रपटांच्या तिकिटांचा काळाबाजार आता रेल्वेच्या कुंपणातही शिरला आहे. सुटय़ांच्या हंगामात भरभरून वाहणाऱ्या आरक्षण यादीच्या पार्श्वभूमीवर या काळाबाजाराला रंग चढला आहे. विशेष म्हणजे रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी कारवाई करत दोन ठिकाणी छापा टाकून तब्बल सव्वादोन लाखांहून अधिक मूल्यांची तिकिटेही जप्त केली. काही दिवसांपूर्वी सुरक्षा दलाच्याच एका पथकाने विमानामार्गे होणारी रेल्वे तिकिटांची तस्करीही पकडली होती. या छाप्यातही एवढय़ाच मूल्यांची तिकिटे जप्त करण्यात आली होती. रेल्वे तिकिटांच्या या काळ्या बाजारामुळे प्रवाशांना मात्र वाजवी रकमेपेक्षा जास्त रक्कम खर्च करावी लागत आहे.
उन्हाळी सुटय़ांचा हंगाम सुरू होण्याच्या दोन महिने आधीपासूनच लांब पल्ल्यांची आरक्षण यादी ओसंडून वाहू लागते. ‘मुलुख’ला आणि ‘गावाक्’ जाणाऱ्या प्रवाशांच्या आरक्षणाच्या उत्साहामुळे प्रतीक्षा यादीही भरभरून वाहायला लागते. अनेक गाडय़ांची प्रतीक्षा यादी तर हजारांच्या वर पोहोचल्याचेही पाहायला मिळते. तिकीट मिळेल की नाही, या चिंतेत असलेल्या प्रवाशांना तिकीट दलालांचा सामना करावा लागत असल्याचे वारंवार समोर आले आहे.
हे दलाल तिकिटे आगाऊ आरक्षित करतात आणि त्यानंतर मग गरजू प्रवाशांना दुप्पट ते तिप्पट किमतीत विकतात. ३५० रुपयांच्या एका तिकिटासाठी हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम मागितली जात असल्याच्या तक्रारीही काही प्रवाशांनी केल्या आहेत. या पाश्र्वभूमीवर रेल्वे सुरक्षा दलाने अशा दलालांना अटक करण्यासाठी खास कारवाई करून दोन घटना उघडकीस आणल्या आहेत. काळबादेवी येथील गीता टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल्समध्ये टाकलेल्या छाप्यात सुरक्षा दलाने बी. बी. खटाल या दलालाकडून एक लाख रुपयांची तिकिटे जप्त केली. तर चार दिवसांपूर्वी टाकलेल्या एका धाडीत एन. नवाब अली आणि अहमद्दीन चौधरी या दोन दलालांकडून सव्वा लाख रुपयांची तिकिटे जप्त करण्यात आली.
यंदा पहिल्यांदाच रेल्वे तिकिटांची विमानमार्गे तस्करी होताना आढळली. त्यामुळे आता तिकीट दलाल वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवत आहेत. मात्र रेल्वे सुरक्षा दलाने तिकीट दलालांना आळा घालण्यासाठी त्याविरोधात उपाययोजना केल्या आहेत, असे रेल्वे सुरक्षा दलाचे विभागीय अधिकारी आलोक बोहरा यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा