सुट्टीत गावाला जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालांच्या चांगलाच पथ्यावर पडली आहे. एकाचवेळी अनेक नावांचा आणि अनेक सिमकार्डचा वापर करून मोठय़ा प्रमाणात तिकिटे काढायची आणि नंतर ती काळ्या बाजारात विकायची असा उद्योग या दलालांनी सुरू केला आहे. आयआरसीटीसी या रेल्वेच्या इ-तिकीट काढून देणाऱ्या यंत्रणेच्याच अधिकृत एजंटांकडून (दलालांकडून)हा काळाबाजार सुरू असल्याने आता या यंत्रणेच्या एकूण कारभाराबाबत संशय निर्माण झाला आहे.
रेल्वेच्या संगणकीकृत आरक्षण केंद्रांमधून अनधिकृत व्यक्तींकडून होणारा तिकीटांचा काळाबाजार रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाने अनेक उपाय योजले आहेत. त्यात प्रवास करणाऱ्या व्यक्तींना त्यांचे छायाचित्रांकित ओळखपत्र सोबत तसेच प्रवासादरम्यान बाळगणे अत्यावश्यक करण्यात आले आहे. मात्र तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्यांनी यावरही मात केली आहे. त्यांनी आयआरसीटीसीच्या मदतीनेच काळाबाजार करण्यास सुरुवात केली आहे.
तिकिटांचा काळाबाजार रोखण्यासाठी आयआरसीटीसी किंवा रेल्वेच्या अधिकृत तिकीट काढून देणाऱ्या व्यक्तींना सकाळी आठ ते दुपारी १२ पर्यंत तिकीटे आरक्षित करण्याची परवानगी नाही. आयआरसीटीसीच्या एजंटांना ठराविक सांकेतिक क्रमांक देण्यात आले आहेत. त्या क्रमांकावरून तिकीट काढण्याचा प्रयत्न झाला तर त्यांना तिकीट मिळत नाही. या काळात केवळ वैयक्तिक प्रवाशांनाच आपली तिकीटे प्रत्यक्ष किंवा इ-मेलद्वारे काढता येतात. याचाच फायदा घेऊन अनेक एजंट एकापेक्षा जास्त खासगी सांकेतिक क्रमांक मिळवून त्याद्वारे तिकिटे काढून ठेवतात. अलीकडेच रेल्वे पोलिसांनी रेल्वेच्या वाणिज्य विभागाच्या मदतीने आयआरसीटीसीच्या काही अधिकृत एजंटांच्या कार्यालयांवर छापे घातले तेव्हा हे प्रकार उघड झाले. एकाचवेळी वेगवेगळ्या संगणकांच्या तसेच खासगी सांकेतिक क्रमांकांच्या आधारे ही तिकिटे काढण्यात आल्याचे उघड झाले. या एजंटांच्या सांकेतिक क्रमांकांमध्ये सतत घोळ असल्याचे रेल्वेच्या वाणिज्य विभागाच्या लक्षात आल्यावर आणि काही गाडय़ांची तिकीटे वेगाने काढली जात असल्याचे लक्षात आल्यावर रेल्वेच्या दक्षता विभागाने त्यावर बारकाईने लक्ष ठेवले आणि त्यातून हे प्रकार उघड झाल्याचे सांगण्यात आले. पकडण्यात आलेल्या काही एजंटांकडे चार महिन्यांनंतरची तिकिटेही मिळाली.
खासगी सांकेतिक क्रमांक मिळविण्यासाठी प्रत्येकवेळी एक भ्रमणध्वनी क्रमांक नोंदवावा लागतो. आयआरसीटीसीच्या अनेक एजंटांकडे एकापेक्षा जास्त मोबाइल क्रमांकांची सिमकार्ड असल्याचे आढळून आले आहे. सकाळच्या चार तासांमध्ये याच भ्रमणध्वनी क्रमांकावरून देण्यात आलेल्या खासगी सांकेतिक क्रमांकांनी तिकिटे काढण्यात येत असल्याचे आढळून आल्यावर रेल्वे पोलिसांनी मुंबईतल्या याएजंटांच्या घरांच्या आणि कार्यालयांच्या झडत्या घेतल्या. तेव्हा अनेक तिकिटे, संगणक संच आणि सिमकार्डस सापडली. धारावीमध्ये कृष्णा टूर्स अॅण्ड ट्रॅव्हलसच्या एजंटकडे ३५ सिमकार्डस सापडली आहेत.आयआरसीटीसीच्या वांद्रे येथील खेरवाडी परिसरातील दोघांची मान्यता रेल्वे बोर्डाने रद्द केलीच आहे. पण अंधेरी, साकी विहार परिसरातील सिटिझन टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स, धारावी, काळा किल्ला परिसरातील शिव टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स आणि गॅलेक्सी टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स, दहिसर येथील निखिल संभव शुभ यात्रा या एजंटांवर रेल्वे पोलिसांनी छापे घातले. रेल्वे प्रशासनाने या सर्वांकडून काढण्यात आलेली इ-तिकिटे रद्द केली असून ज्या प्रवाशांनी या एजंटांकडून तिकिटे काढली आहेत त्यांनी आपली तिकिटे तपासून पाहावीत, असे आवाहन केले आहे.
अधिकृत दलालांकडूनच तिकिटांचा काळाबाजार
सुट्टीत गावाला जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालांच्या चांगलाच पथ्यावर पडली आहे. एकाचवेळी अनेक नावांचा आणि अनेक सिमकार्डचा वापर करून मोठय़ा प्रमाणात तिकिटे काढायची आणि नंतर ती काळ्या बाजारात विकायची असा उद्योग या दलालांनी सुरू केला आहे.
First published on: 01-05-2013 at 01:59 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Black marketing of railway tickets by legal procurers