सल्लागाराऐवजी पॅनेल नियुक्तीची सत्ताधाऱ्यांची मागणी
महापालिकेने हाती घेतलेली रस्त्यांची कामे रखडली असून त्याचा आपल्यावर ठपका येऊ नये यासाठी सत्ताधारी चिंतीत झाले आहेत. परिणामी रखडलेल्या कामांना सल्लागार जबाबदार असल्याचा कांगावा करीत शिवसेनेने आयआयटीच्या कार्यपद्धतीवरच आक्षेप घेतला आहे. या कामांसाठी स्वतंत्र पॅनेल नियुक्त करण्याची मागणीही सेनेने केली आहे.
गेल्या पावसाळ्यात ‘खड्डय़ात’ गेलेल्या तसेच अनेक वर्षे डागडुजी न झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. त्यामध्ये रस्त्यांटे डांबरीकरण, सिमेंटीकरण करण्यात येणार होते. या कामाबाबत सल्ला देण्यासाठी आयआयटीची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. पावसाळा जवळ आला असून रस्त्यांची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे सत्ताधारी शिवसेनेने या विलंबाचा ठपका आयआयटीच्या माथी मारायला सुरुवात केली आहे.
सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आल्यानंतर आयआयटीने सल्ला देण्यास तीन-चार महिन्यांचा कालावधी घेतला. त्यामुळे ही कामे विलंबाने सुरू झाली. त्यामुळे अशा कामांसाठी सल्लागाराची नियुक्ती करण्याऐवजी स्वतंत्र पॅनेल स्थापन करावे. त्यामुळे रस्त्यांच्या कामांना गती येईल. या संदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा करून पॅनेलची नियुक्ती करावी, असे पत्र स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी अतिरिक्त आयुक्त असीम गुप्ता यांना पाठविले           आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा