तालुक्यातील बारडगाव दगडी येथे चारा छावणीत गैरव्यवहार झाल्याचा ठपका सीआयडीने ठेवला असून, तत्कालीन तहसीलदार सुरेश थोरात, मंडल निरीक्षक आर. डी. रासकर, कामगार तलाठी एम. जे. आर. आय. हुंदाडे, अव्वल कारकून, लिपिक आय. जे. साळुंके यांची विभागीय अधिकारी यांच्यामार्फत चौकशीनंतर कारवाई होणार आहे. तसे आदेश नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
महसूल विभागाचे जिल्हा स्तरावरील अधिकारीही जबाबदार असून, त्यांच्यावरही कारवाईचे संकेत सीयआयडीने दिले आहेत, मात्र हा अहवालच दडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान, तहसील कार्यालयातील अव्वल कारकून आर. आय. हुंदाडे व लिपिक आय. जे. साळुंके हे कारवाईच्या भीतीने अनेक दिवसांपासून रजेवर आहेत.
बारडगाव दगडी येथील एकनाथ पाटील ग्रामीण विकास संस्थेच्या चारा घोटाळा प्रकरणाची सीआयडी चौकशी होऊन डेपोचालक चमस एकनाथ थोरात, पुरवठादार कैलास पालकर, वजनकाटय़ाचे मालक कुशाभाऊ नेटके व आत्माराम मोढळे यांच्यावर फसवणुकीचा गन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी पुरवठादार कैलास पालकर याला अटक केली आहे. पालकर हा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक असून थोरात यांचा जावई आहे.
दरम्यान, यामध्ये महसूल विभागाचे अधिकारीदेखील सहभागी आहेत. तत्कालीन तहसीलदार सुरेश थोरात यांची त्या वेळी तडकाफडकी बदली करण्यात आली होती. त्यांच्या सहभागानेच या संस्थेसह प्रत्येक संस्थेला चेक दिले गेले आहेत. तक्रारी आल्यावरदेखील संस्थाना तहसीलदार सुरेश थोरात यांनी स्वत:च्या अधिकारात चेक दिले व तो माझा अधिकार आहे असे त्या वेळी ते सांगत होते. जिल्हय़ातील महसूल व पुनर्वसन अधिकाऱ्यांनी याची वेळोवेळी पाहणी केली आहे, त्यांच्या कामात कसूर झाली काय, याचीही तपासणी करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तत्कालीन तहसीलदार थोरात यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्जही केला होता. यावरून त्यांना सीआयडीच्या अहवालाची माहिती आधीच मिळाली काय अशी शंका निर्माण होते. या प्रकरणांची माहिती प्रभारी तहसीलदार जैयसिंग भैसडे यांनी दडवून ठेवल्याची तक्रार आता होऊ लागली आहे.  

Story img Loader