देहूरोड येथील दारूगोळा कारखान्यात स्फोटकात वापरण्यात येणारे दोन पदार्थ मिसळताना झालेल्या स्फोटात चार कामगार जखमी झाले. मंगळवारी सकाळी दहा वाजून चाळीस मिनीटांनी ही घटना घडली. यामधील दोन कामगारांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू
आहेत.
बी. टी. सोनजे (रा. पिंपरी), एच. व्ही. पडाळे (सूस रोड), एम. एम. क्षीरसागर (रा. आदर्शनगर, देहूरोड) आणि एन. एन. अकुलवार (रा. देहूगाव) अशी जखमी झालेल्या चौघांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहूरोड दारूगोळा कारखान्याच्या १७८ क्रमांकाच्या खोलीत सकाळी स्फोटक बनविण्यासाठी वापरले जाणारे दोन पदार्थ एकत्र करत असताना हा स्फोट झाला. त्यामध्ये कारखान्यातील चार कर्मचारी जखमी झाले आहेत. यामध्ये सोनजे व पडाळे हे गंभीर जखमी आहेत. सोनजे यांचा हाताला गंभीर जखम झाली असून पडाळे हे भाजले असून त्यांच्यावर सूर्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तर इतर जखमींवर रुबी हॉस्पिटल
मध्ये उपचार सुरू आहेत.
सकाळी स्फोट झाल्याचे समजल्यानंतर बॉम्ब शोधक व नाशक पथक घटनास्थळी दाखल झाले होते.
याबाबत देहूरोड पोलीस ठाण्याचे निरीक्षक राम जाधव यांनी सांगितले, की हा प्रकार म्हणजे दुर्घटना आहे. दोन पदार्थ एकत्र करत असताना हा स्फोट झाला असून यामध्ये चार कर्मचारी जखमी आहेत. या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोकरीवर घेतानाच त्यांना या धोक्याची कल्पना देण्यात येते. त्यामुळे त्यांना धोक्याची पूर्ण
जाणीव असते. या ठिकाणी काम करणारे हे तज्ज्ञ असतात. त्यामुळे या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा