सूचना नसताना उपाशीपोटी लोहयुक्त गोळ्या दिल्याने औंढा नागनाथ तालुक्यातील जलालदाभा शाळेमधील ९० विद्यार्थ्यांना पोटात मळमळ, उलटी, पोटदुखीचा त्रास सुरू झाला. त्यामुळे या विद्यार्थ्यांना औंढय़ाच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी आरोग्य विभागाने शिक्षकांच्या माथी खापर फोडले असल्याचे चौकशी अहवालातून उघडकीस आले.
आरोग्य संघटनेच्या कार्यक्रमांतर्गत (डब्ल्यूआयएफएस) औंढय़ाच्या गटविकास अधिकारी व बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी जंतनाशक व आयर्न फॉलिक अॅसिड या गोळ्यांचे वाटप करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, जंतनाशक गोळ्या खाऊ घालण्याऐवजी मुलांना आयर्न फॉलिक अॅसिड या शक्तिवर्धक गोळ्या उपाशीपोटी देण्यात आल्या. परिणामी ९० पैकी ६५ विद्यार्थ्यांना औंढा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकारामुळे मोठी खळबळ उडाली. या प्रकरणी चौकशीअंती आरोग्य विभागाने लोहयुक्त गोळ्या प्रकरणांचे खापर शिक्षकांच्या माथी फोडले.
दरम्यान, २६ जूनला या दोन्ही गोळ्यांचे जि. प. च्या शाळांमधील शिक्षकांना बालविकास अधिकारी व गटशिक्षण अधिकारी यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना वाटप करण्यासाठी वितरण करण्यात आले. दुसऱ्या दिवशी केवळ जंतनाशक गोळ्यांचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यास शिक्षकांना सांगण्यात आले होते. मात्र, या गोळ्या देण्याऐवजी उपाशीपोटी प्रत्यक्षात शक्तिवर्धक गोळ्यांचे वाटप करण्यात आले. त्यामुळे या विद्यार्थ्यांना त्रास सुरू झाला. हे सर्व घडत असताना या गोळ्यांचे वाटप कसे करायचे, याचे रीतसर प्रशिक्षण शिक्षकांना दि. २८ ला औंढय़ात देण्यात आल्याची माहिती मिळाली. या पाश्र्वभूमीवर या प्रकरणी आरोग्य विभागाचे अधिकारी आपली जबाबदारी झटकत असून, सारे खापर शिक्षकांच्या माथी फोडण्याचा उद्योग सुरू असल्याचे सादर झालेल्या अहवालावरून दिसते.

Story img Loader