राज्याचे अपंग कल्याण आयुक्तालय, राजस्थानमधील जयपूर रग फाउंडेशन आणि येथील आधार मतिमंद मुलांची शाळा यांच्यावतीने राज्यातील दहा हजार अस्थिव्यंग, मतिमंद, अंध व मुकबधीर व्यक्तींना हातमागावर उच्च प्रतीचा गालिचा बनविण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांना प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध करून देणारा महत्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येणार आहे. प्रारंभी १५ जणांना सहा महिन्यात प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून हे काम करवून घेतले जाणार आहे. या पथदर्शक प्रकल्पाची सुरूवात मालेगावपासून होत असून नंतर राज्यभर त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. गालिचा बनविण्याचे कौशल्य प्राप्त होणाऱ्या अंध-अपंगांचा आत्मविश्वास त्यामुळे नक्की उंचावेल, अशी आशा आहे.
अंध, मुकबधिर, अस्थिव्यंग या सारख्या शारीरिक आणि मानसिकदृष्टय़ा कमकुवत व्यक्तींकडे समाज हेटाळणीच्या दृष्टीकोनातून पहात असतो. कोणतेही काम करण्याची त्यांच्यात क्षमता नसल्याचा गैरसमज आहे. मात्र, योग्य त्या संधी अन् त्या अनुषंगाने प्रशिक्षण उपलब्ध करून दिल्यास अशा व्यक्ती देखील कौशल्याची अनेक कामे सफाईदारपणे करू शकतात असा या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. नवी दिल्ली येथे अलीकडेच आयोजित देशभरातील विविध स्वयंसेवी संघटनांच्या बैठकीत ही बाब प्रकर्षांने पुढे आली होती. त्यातून जयपूरच्या रग फाऊंडेशनने अशा व्यक्तींना गालिचा बनविण्याचे काम उपलब्ध करून देण्याची जबाबदारी स्वीकारली. एवढेच नव्हे तर, हे काम करू इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी प्रशिक्षण देण्यासाठी काही प्रमाणात आर्थिक भार पेलण्याची तयारीही संस्थेने दर्शविली आहे.
जयपूर रग फाउंडेशन संस्थेचा गालिचा बनविण्याच्या उद्योगात जागतिक पातळीवर दबदबा असून त्यांच्याकडे आगामी चार वर्षांत उत्पादित होणाऱ्या मालाची मागणी आधीच नोंदवली गेली आहे. त्यांच्यामार्फत उत्पादित होणाऱ्या गालिचाची किंमत पंचवीस हजारापासून पन्नास लाखापर्यंत आहे. सध्या देशभरातील चाळीस हजार आदिवासींना संस्थेने हे काम उपलब्ध करून दिले आहे. आता शारीरिक व मानसिकदृष्टय़ा कमकुवत व्यक्तींकडूनही ते करवून घेण्याचे प्रयत्न आहेत. देशातील एक लाख अपंगांना प्रशिक्षणाबरोबर रोजगार उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा मानस आहे. प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या व्यक्तींना गालिचासाठी लागणारा कच्चा माल पुरविला जाईल. त्यांच्या कामाचा त्यांना विशिष्ट मोबदला दिला जाणार आहे. विशेष म्हणजे, सर्वसामान्य कामगारांना दिल्या जाणाऱ्या मोबदल्यापेक्षा अपंगांना मानवतेच्या भावनेतून पन्नास टक्के जादा रक्कम दिली जाणार आहे. या माध्यमातून प्रत्येकास किमान तीन ते दहा हजार रुपयांपर्यंत दरमहा उत्पन्न प्राप्त होईल.
प्रशिक्षणासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून चार विशेष तज्ज्ञांची निवड करण्यात आली आहे. फाऊंडेशनचे विशेष प्रशिक्षक त्यांना सुरूवातीला येथे प्रशिक्षण देतील. नंतर या तज्ज्ञ प्रशिक्षकांद्वारे विविध जिल्ह्यांमधील अपंगांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अपंग प्रशिक्षणार्थीना प्रवास भत्ता व अल्पोहाराची सोय केली जाईल. साधारणत: एका प्रशिक्षणार्थीवर ५० हजार रुपये खर्च अपेक्षित असून तो अपंग कल्याण आयुक्त, जयपूर रग फाउंडेशन, आधार मतिमंद शाळा व अन्य स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून भागविला जाणार आहे. मालेगाव येथे होणाऱ्या पथदर्शक प्रकल्पाचा शुभारंभ ३ डिसेंबर रोजी म्हणजे अपंगदिनी भायगाव शिवारातील आधार मतिमंद शाळेत होणार आहे. अपंगाना स्वावलंबी बनवून त्यांचे विश्व समृध्द करण्याच्या दृष्टिने हा उपक्रम मोलाचा ठरणार असल्याचा विश्वास आधार मतिमंद शाळेचे संचालक गोकुळ देवरे व सल्लागार जितुभाई कुटमुटिया यांनी व्यक्त केला.