छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्याबद्दल अवघ्या महाराष्ट्रीयांच्या मनात कुतूहल असून इतिहास शिकणाऱ्या प्रत्येकाला या किल्ल्याचे आकर्षण आहे. अंध विद्यार्थीही त्यास अपवाद नाहीत. म्हणूनच अंध विद्यार्थ्यांना शिवनेरी किल्ल्याची सैर घडवून आणण्याची मोहिम नुकतीच नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (नॅब) आणि मुंबईच्या जिजाऊ प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात आला. रविवारी सुमारे ३२ अंध विद्यार्थानी शिवनेरी आणि त्याच्या जवळच्या लेण्याद्री येथील गणेश मंदिराला भेट देऊन इतिहासातील अनेक गोष्टी स्पर्शाने समजून घेण्याचा प्रयत्न केला.
मुंबईतील वरळीमध्ये नॅबची अंधांना प्रशिक्षण देणारे केंद्र आहे. संस्थेच्या माध्यमातून अंध व्यक्तींना स्वयंपुर्ण करण्याच्या दृष्टीने शिक्षण आणि उपक्रम राबवले जातात. अंध मुलांना सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणेच या जगाचा अनुभव घेता यावा, येथील निसर्ग, इतिहास, विकास या सर्वाचे साक्षीदार होता यावे यासाठी नॅब संस्थेच्या वतीने जिजाऊ प्रतिष्ठानकडे या इतिहास भ्रमंती उपक्रमासंदर्भात विचारणा करण्यात आली होती. दुर्गभ्रमण क्षेत्रात कार्यरत
असलेल्या चंद्रकांत साटम यांना ही कल्पना आवडली आणि २०१० पासून ही अनोखा उपक्रम सुरू झाला. या माध्यमातून आत्तापर्यंत सिंहगड, भाजाची लेणी, लोहगड आणि स्वराज्याची राजधानी रायगड अशा मोहिमा आखुन त्या फत्ते करण्यात आल्या. यंदा मे महिन्याच्या सुट्टीत शिवनेरी किल्ल्यावर भटकंतीचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवलीतल्या अनेक स्वयंसेवकांनी या उपक्रमात सहभागी होत या अंध विद्यार्थ्यांना सहकार्य केले. शनिवारी मध्यरात्री या मोहिमेला मुंबईतुन सुरुवात झाली.
सुरूवातीला मुले लेण्याद्रीच्या गिरीजात्मक मंदिरामध्ये पोहचले. अध्यात्मिक महत्व असलेल्या या पर्यटन स्थळाची परिपुर्ण माहिती देण्याची व्यवस्था संस्थेच्या वतीने चंद्रकांत साटम करत होते. अंध विद्यार्थाचा हा उत्साह पाहिल्यानंतर मंदिर व्यवस्थापनाने त्यांचे कौतुक करत लेण्याद्री मंदिराच्या परिसरात असलेला एक प्राचीन ऐतिहासीक स्तूप पाहण्यासाठी खुला करून दिला. इतिहासामध्ये स्तूप या प्रकाराबद्दल विद्यार्थाना माहिती होते मात्र त्याला नेमका स्पर्श करत त्याची गुंफा, गोलाई आणि खांबांची माहिती करून घेतली. त्यानंतर शिवनेरीकडे या विद्यार्थानी मोर्चा वळवला. किल्ला चढताना दमछाक होत असली तरी इतिहास जाणून घेण्याबद्दलची कमालीची उत्सुकता या विद्यार्थाच्या चेहऱ्यावर दिसत होती. शिवाई मंदिर, अंबरखाना, गंगा जमुना पाण्याचे टाके, शिवरायांचे जन्मस्थान, शिवकुंज आणि कडेलोट कडा अशा सर्व ठिकाणाला या विद्यार्थानी भेट देऊन गड दर्शनाचा आनंद घेतला. किल्ल्याची छोटी प्रतिकृती सोबत नेण्यात आली होती. मोहिम संपल्यानंतर त्यात सहभागी झालेल्या व्यंकटेश परब या विद्यार्थाने शिवनेरीच्या स्पर्शाने प्रफुल्लीत झाल्याची भावना व्यक्त केली. कल्याणचे विलास वैद्य आणि अन्य स्वयंसेवक या उपक्रमात सहभागी झाले होते.   

Story img Loader