मुलींना ब्लॅकमेल करण्याचे प्रकार, जैनकांडाने उपराजधानी कलंकित
एमआयडीसी परिसरात गीतांजली इंजिनिअरिंग कार्पोरेशन नावाने मोटार पार्टचा कारखाना चालविणाऱ्या व्यावसायिकाच्या अटकेमुळे नागपुरात ब्ल्यू फिल्म बनविणाऱ्या रॅकेटचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत असल्याच्या संशयाला बळकटी मिळाली आहे. गलेलठ्ठ पगाराचे आमिष दाखवून मुलींना नोकरी द्यायची आणि नंतर त्यांना जाळ्यात ओढून अश्लील चित्रफीत तयार करायची, अशी जैन याची कार्यपद्धती होती. त्यामुळे नागपुरातील अन्य ठिकाणी अशा अश्लील चित्रफिती तयार होत आहेत का, याकडे पोलिसांनी लक्ष केंद्रित केले असून यात असंख्य तरुणींना ब्लॅकमेलिंग करून अडकविण्यात आले असावे, असा संशय आहे.
धर्मेद्र बन्सीलाल जैन हा ४८ वर्षांचा व्यावसायिक त्याच्या कारखान्यात मुलींना ब्लॅकमेल करून त्यांच्या अश्लील चित्रफिती बनवत असल्याची तक्रार त्याच्या पत्नीनेच अंबाझरी पोलीस ठाण्यात केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. धर्मेद्रच्या लॅपटॉपमध्ये अनेक चित्रफिती आढळून आल्या असून त्याच्या कारखान्यावर धाड घालून पोलिसांनी काही सीडी जप्त केल्या आहेत. सध्या प्रकृतीच्या कारणास्तव जैन रुग्णालयात दाखल असून त्याची नंतर कसून चौकशी केली जाईल, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. एका अश्लील सीडीसाठी जैनला आंतरराष्ट्रीय बाजारात ५० हजार रुपये किंमत मिळत होती, असे उघड झाले आहे. त्यामुळे अन्य ठिकाणीही असे प्रकार घडत असल्याच्या दिशेने पोलिसांनी चौकशीची दिशा वळविली आहे.
धर्मेद्र हा प्रताप नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रसाद नगरात एका आलिशान बंगल्यात राहतो. त्याच्या पत्नीला याची माहिती मिळाल्यानंतर तिने धर्मेद्रला असे काम बंद करण्याची सूचना केली होती. परंतु, त्याने पत्नीचीच अश्लील क्लिप बनवून ती इंटनेटवर टाकण्याची धमकी दिली. तसेच अनेकदा तिला मारहाणही केली. त्याला दोन मुले असून एका मुलालाही अशी चित्रफित लॅपटॉपमध्ये आढळून आली होती. दोन्ही मुलांनाही त्याने त्रास देणे सुरू केले होते. याचा अतिरेक झाल्यानंतर पत्नीने थेट पोलिसांतच धाव घेऊन पतीच्या कृष्णकृत्याचा भंडाफोड केला. त्याने तयार केलेली एक सीडी हाती लागल्यानंतर पोलिसांच्या स्वाधीन करून तिने पतीविरुद्ध तक्रार नोंदविली. पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन तिने त्याच्या कृष्णकृत्यांचा पाढा वाचला. दीड वर्षांपूर्वी तिने अशीच तक्रार नोंदविली होती.
धर्मेद्र जैन हा त्याच्या बंगल्यावर किंवा कारखान्यात अनेक तरुण मुलींना घेऊन यायचा अशी माहिती अनेकांनी दिली आहे. काही मुलींची या प्रकरणी चौकशीही करण्यात आल्याचे समजते परंतु, त्या मुलींनी काहीच माहिती न दिल्यामुळे पोलिसांना त्याच्याविरुद्ध कारवाई करणे कठीण गेले. धर्मेद्रची पत्नी त्याच्यापासून दोन मुलांसह वेगळी राहत आहे. त्याने एकदा केरोसिन अंगावर टाकून आपल्याला जाळण्याचा प्रयत्न केला, असेही तिने तक्रारीत म्हटले आहे. सह पोलीस आयुक्त संजय सक्सेना यांची भेट घेतल्यानंतर पोलिसांनी आपल्या पद्धतीने याचा तपास सुरू केला. जैन याच्या कार्यालयाची झडती घेतल्यानंतर पोलिसांनीही धक्काच बसला. कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात आला असून त्याद्वारे अश्लील चित्रिकरण केले जात होते. अनेक मुली त्याच्याच कार्यालयात नोकरी करणाऱ्या आहेत. पोलीस निरीक्षक माधव गिरी यांच्याकडे याची तक्रार पोहोचल्यानंतर त्यांनी जैनला ताब्यात घेऊन अंबाझरी पोलिसांच्या स्वाधीन केले. जैन याने पोलीस ठाण्यातच पत्नी व दोन्ही मुलांना जीवे मारण्याची धमकी दिली, असे समजते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा