पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे रखडलेला स्थायी समितीचा अर्थसंकल्प उद्या, मंगळवारी समितीचे अध्यक्ष नरेंद्र बोरकर सभागृहात सादर करणार आहे. यावेळेचा अर्थसंकल्प १६०० कोटींच्या जवळपास आहे. महापालिका आयुक्त श्याम वर्धने यांनी सादर केलेल्या प्रस्तावित अर्थसंकल्पाच्या तुलनेत स्थायी समिती अध्यक्ष नरेंद्र बोरकर यांच्याकडून सादर होणारा अर्थसंकल्प सुमारे ३५० कोटींनी जास्त राहणार आहे.
या अर्थसंकल्पात आगामी विधानसभा निवडणुका समोर ठेवून काही नव्या योजनांसह शहरातील जेएनयूआरएमअंतर्गत सुरू असलेल्या कामांसोबत आरोग्य आणि शैक्षणिक क्षेत्राला हायटेक करण्याच्या दृष्टीने काही नवीन योजना जाहीर करण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य करामुळे महापालिकेची आर्थिक स्थिती कमकुवत असली तरी समोर निवडणुका बघता नागरिकांवर कुठलाही कर लादण्याचा विचार नाही. जुन्या योजनांना प्राधान्य देत नवे आणि जुने असा साधक बाधक अर्थसंकल्प मांडणार असून त्यात माजी स्थायी समिती अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी गेल्या अर्थसंकल्पात मांडण्यात आलेल्या योजना कायम ठेवणार आहे. महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी नागरिकांवर कर न लादता नवीन काही योजना अंमलात आणण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. बचत गटाच्या माध्यमातून विविध योजना राबवून उत्पन्नाचे स्रोत कसे वाढवता येईल त्यादृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहे. या शिवाय सावित्रीबाई फुले योजनेवर आधारित आणखी काही योजनांची घोषणा होण्याची शक्यता आहे. ई-गव्‍‌र्हनन्सच्या माध्यमातून कराचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाण्याची शक्यता आहे. आयुक्तांच्या अर्थसंकल्पापेक्षा स्थायी समितीचा अर्थसंकल्प हा साधारण १००-१२५ने जास्त असतो. एलबीटीवर आधारित हा दुसरा अर्थसंकल्प राहणार आहे.
बोरकर यांचा अर्थसंकल्प १६०० कोटी तुटीचा राहणार असल्याचे संकेत त्यांनी आधीच दिले आहे.  गतवर्षीच्या महापालिकेच्या उत्पन्नात एलबीटीमुळे २०० कोटींची तूट निर्माण झाली आहे. अपेक्षेपेक्षा कमी उत्पन्नाची छाप आयुक्त वर्धने यांनी सादर केलेल्या प्रस्तावित अर्थसंकल्पात दिसून आली. त्यांनी २०१३-१४ या वर्षांसाठी १०६१.५१ कोटींचा प्रस्तावित अर्थसंकल्प दिला होता. त्यासाठी अपेक्षित धरण्यात आलेल्या उत्पन्नाचे लक्ष्यही प्रशासनाला गाठता आले नाही. स्थानिक स्वराज्य कर आणि मालमत्ता कराच्या वसुलीत अपेक्षेपेक्षा कमी उत्पन्न मिळाले. २०१३-१४ या आर्थिक वर्षांत महापालिकेला विविध स्रोतामधून मिळालेले वास्तविक उत्पन्न ८०१ कोटी रुपये आहे. दुसरीकडे आयुक्तांनी सादर केलेला प्रस्तावित अर्थसंकल्प ‘रिऑलिस्टिक’ असल्याचा दावा केला होता. यामुळे बोरकर यांच्या अर्थसंकल्पाकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. उत्तर मध्य झोन सिवरेज प्रकल्पासाठी केंद्राने ४९१ कोटींचा निधी मंजूर केला. सोबतच राज्य शासनाने २०० कोटींचे कर्ज मंजूर केले. केंद्रात भाजपची सत्ता असल्याने शहराला केंद्राकडून मोठा निधी मिळण्याची अपेक्षा आहे. यामुळे महापालिकेच्या अर्थसंकल्पात भरीव वाढ होण्याची अपेक्षा होती. मात्र, बोरकर यांनी ८०१ कोटींच्या वास्तविक उत्पन्नाच्या दुप्पट म्हणजेच १६०० कोटीच्या घरात अर्थसंकल्प तयार केला आहे. गत पाच वर्षांत २०११-१२ आणि १३-१४चा अर्थसंकल्प वगळता सर्वच अर्थसंकल्प मे अखेर नंतरच सादर करण्यात आले आहे. २००८-०९चा अर्थसंकल्प ५ जुलैला, २००९-१०चा २८ जुलैला, २०१०-११चा २९ मे रोजी, २०११-१२चा २८ एप्रिलला, दयाशंकर तिवारी यांनी ६ जून तर अविनाश ठाकरे यांनी गेल्यावर्षी २९ मे रोजी अर्थसंकल्प सादर केला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा