मुंबईकरांना भेडसावणाऱ्या नागरी प्रश्नांसाठी वेळोवेळी पालिका सभागृहात झगडणारे मुंबईमधील सर्वच नगरसेवक गेल्या चार महिन्यांपासून पालिकेकडून मिळणाऱ्या मानधनापासून वंचित राहिले आहेत. पालिकेकडून मिळणारे मानधन धनादेशाद्वारे थेट नगरसेवकांच्या बँक खात्यावर जमा होते. परंतु बहुतांश नगरसेवक बँक खाते पुस्तिका नियमितपणे पाहात नसल्यामुळे मानधन जमाच होत नसल्याचे त्यांना समजलेच नसल्याची बाबही उघड झाली आहे! काही नगरसेवकांच्या ध्यानात ही बाब येताच दिवाळी सुरू झाली तरी हक्काचे मानधन न मिळाल्याने त्यांनी आपापल्या नेत्यांपुढे गाऱ्हाणे मांडले आहे.
मुंबई महापालिकेकडून नगरसेवकांना दर महिना १० हजार रुपये मानधन दिले जाते. त्याशिवाय पालिकेचे काम अधिक सुकरपणे व्हावे, केलेल्या तक्रारीचे पुढे काय झाले हे समजावे, तसेच अधिकाऱ्यांशी ई-मेलद्वारे संपर्क साधता यावा यासाठी प्रशासनाने माहिती आणि तंत्रज्ञानाची कास धरत नगरसेवकांना लॅपटॉप आणि अॅड्रॉइड मोबाइलही दिले. काही महिन्यांपूर्वी प्रशासनाकडून नगरसेवकांच्या मोबाइल बिलाचा भरणा वेळीच होऊ शकला नव्हता. परिणामी नगरसेवकांना पालिकेकडून मिळालेल्या मोबाइलवरुन इतरांशी संपर्क साधता येत नव्हता. या मोबाइलवरुन तसा प्रयत्न केल्यास, बिलाचा भरणा झाला नसल्याची सूचना मिळत होती. त्यामुळे या मोबाइलवर केवळ इतरांचे फोन येत होते. आता त्यात या मानधनहानीची भर पडली आहे. गेल्या काही वर्षांपासून मानधनाची रक्कम दरमहा २५ हजार रुपये व्हावी, अशी मागणी नगरसेवकांकडून करण्यात येत होती. नगरसेवकांचे मानधन वाढविण्याची बाब पालिका प्रशासनाच्या हाती नाही. त्यामुळे हा प्रस्ताव प्रशासनाने नगरविकास खात्याकडे पाठवून दिला आहे. अद्यापही त्यावर कोणतेच उत्तर प्रशासनाला मिळालेले नाही.
त्यामुळे नगरसेवकांच्या मानधनात वाढ होऊ शकलेली नाही. आता तर मानधनाचे १० हजार रुपयेही चार महिन्यांपासून मिळाले नसल्याने हा मुद्दा सभागृहात उपस्थित करून प्रशासनाला अडचणीत आणण्याच्या विचारात नगरसेवक आहेत. परंतु विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या पाश्र्वभूमीवर सत्ताधाऱ्यांनी याबाबत नरमाईचे धोरण अवलंबले आहे.दरम्यान, नगरसेवकांचे ऑगस्टपर्यंतचे मानधन देण्यात आले आहे. परंतु त्यानंतच्या महिन्यांच्या मानधनाची आवश्यक ती कागदपत्रे चिटणीस विभागाकडून सादर झालेली नाहीत, असे प्रमुख लेखापाल (वित्त) हरिभाऊ निकम यांनी सांगितले. पूर्वी नगरसेवकांना मानधनाची रोख रक्कम देण्यात येत होती. आता त्यांच्या बँक खात्यात ती थेट जमा होते. नगरसेवकांच्या मानधनाची कागदपत्रे प्रमुख लेखापाल विभागाकडे सादर केली आहेत, असे महापालिका चिटणीस नारायण पठाडे यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा