मुंबईचा झपाटय़ाने विकास होत असून अग्निशमन दलापुढील आव्हाने वाढत आहेत. ही बाब लक्षात घेऊन अग्निशमन दल अधिक सक्षम करण्याचा निर्णय पालिकेने घेतला असून त्यासाठी आधुनिक यंत्रसामग्री खरेदी करण्यात येणार आहे. तसेच नव्या प्रशिक्षण केंद्राची स्थापनाही करण्याचा प्रशासनाचा विचार आहे.
मुंबई बंदरात ‘एस.एस. फोर्ट स्टिकीन’ या बोटीवरील दारूगोळ्याने १४ एप्रिल १९४४ रोजी पेट घेतला. त्यानंतर उसळलेल्या अग्निकल्लोळाशी झुंज देताना पालिकेच्या अग्निशमन दलातील ६६ अधिकारी आणि जवानांना प्राण गमवावे लागले. त्यानिमित्त १४ एप्रिल हा दिवस ‘अग्निशमन सेवा दिन’ म्हणून पाळण्यात येतो. यानिमित्त भायखळा येथील अग्निशमन दलाच्या मुख्यालयात श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी अग्निशमन दल अधिक सक्षम करण्याची घोषणा केली.
गेल्या वर्षी मुंबईत घडलेल्या आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन दलाने महत्त्वपूर्ण कामगिरी पार पाडली. मंत्रालयाला लागलेली आग ही त्यापैकीच एक घटना. गेल्या वर्षभरात विविध घटनांमध्ये सात अधिकारी आणि ४१ जवान जखमी झाले. मंत्रालयाला पुन्हा लागलेल्या आगीवर अवघ्या २० मिनिटांमध्ये नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दल यशस्वी झाले, असे सांगून सीताराम कुंटे म्हणाले की, पालिकेच्या २०१२-१३ च्या अर्थसंकल्पात अग्निशमन दलासाठी ८२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. अग्निशमन दलाच्या कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ करण्यासाठी २०१३-१४ च्या अर्थसंकल्पात १६३ कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. दलासाठी नवीन प्रशिक्षण केंद्रे स्थापन करण्याचा विचार प्राधान्याने सुरू असून आधुनिक साधनसामग्री खरेदी करण्यासाठी अधिक निधी प्रस्तावित करण्यात आला आहे.
नागरिकांचे आणि मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी सदैव तत्पर राहणाऱ्या अग्निशमन दलातील अधिकारी आणि जवानांच्या आरोग्याची काळजी घेणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे अधिकारी आणि जवानांसाठी मधुमेह आणि रक्तदाब चाचणी शिबिरांचे आयोजन करावे, अशी सूचना महापौर सुनील प्रभू यांनी या वेळी केली. तसेच १२६ व्या वर्षांत पदार्पण करणाऱ्या अग्निशमन दलाची यशोगाथा विशद करणारी आंतरराष्ट्रीय चित्रफीत बनवावी, गेल्या १२५ वर्षांतील अग्निशमन दलातील स्थित्यंतरे, जुन्या वाहनांचे जतन, आधुनिकीकरण यांचा इतिहास सांगणारे एक प्रदर्शन उभारावे, असेही महापौर म्हणाले.
 समारंभास माजी महापौर श्रद्धा जाधव, मुंबई पोर्ट ट्रस्टचे बंदर सुरक्षा आणि अग्निशमन अधिकारी पी. पी. भोंडे, साहाय्यक आयुक्त रमेश पवार, प्रमुख अग्निशमन अधिकारी सुहास जोशी आदी उपस्थित होते.

Story img Loader