पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाची साद घालताच मुंबई महापालिकेने मोठय़ा झोकात आपल्या मालमत्ता आणि सार्वजनिक ठिकाणी सफाई मोहीम हाती घेतली. या मोहिमेसाठी स्वतंत्र कक्ष सुरू करून विविध विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना दावणीला बांधले आहे. विकास कामामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अभियंत्यांचीही त्यातून सुटका झालेली नाही. परिणामी अभियांत्रिकी कामाची आवड असलेल्या अभियंत्यांवर सध्या कार्यालयात बसून कारकुनी करण्याची वेळ आली आहे.
नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाची घोषणा करताच देशभरातून त्यांना भरभरून प्रतिसाद मिळू लागला. राजकारणी, सनदी अधिकारी, अभिनेते आदींनी हाती झाडू घेत या अभियानात उडी घेतली. मुंबई स्वच्छ करून अभियान यशस्वी करण्यासाठी महापालिकेनेही कंबर कसली. या अभियानासाठी महापालिकेने स्वतंत्र कक्ष सुरू केला आणि पालिकेच्या विविध विभागातील ४६ अधिकाऱ्यांची त्यासाठी नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली. त्याबरोबर नियंत्रण कक्षात तीन संगणक व १३ कर्मचारी तैनात करण्यात आले. या अभियानाअंतर्गत आपआपल्या विभागात दररोज केल्या जाणाऱ्या साफसफाईच्या कामाचा लेखाजोखा गोळा करून तो नियंत्रण कक्षाकडे पाठविण्याची जबाबदारी नोडल अधिकाऱ्यावर सोपविण्यात आली. तसेच नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांना नोडल अधिकाऱ्यांनी पाठविलेले ई-मेल तपासून त्याचा अहवाल तयार करून तो अतिरिक्त आयुक्त व उपायुक्तांना दररोज नित्य नियमाने पाठविण्याचे सक्त आदेश देण्यात आले आहेत. नियंत्रण कक्षात नियुक्त करण्यात आलेल्या १३ जणांमध्ये एक साहाय्यक अभियंता, चार दुय्यम अभियंते व २ कनिष्ठ अभियंते अशा ७ अभियंत्यांचा समावेश आहे. मुंबईच्या विकास कामासाठी तसेच नागरी कामांसाठी पालिकेने आपल्या सेवेत अभियंत्यांची फौज सज्ज केली आहे. मात्र सध्या अनेक अभियंत्यांना अभियांत्रिकी कामापासून दूर ठेवण्यात येत आहे त्यापैकी हे ७ अभियंते. सध्या अभियांत्रिकी काम करण्याऐवजी त्यांच्यावर कारकुनाचे काम करण्याची वेळ आली आहे.
या सातजणांच्या वेतनावर महापालिका दर महिन्याला सरासरी ५ लाख रुपये खर्च करीत आहे. म्हणजेच वर्षांकाठी पालिकेला ६० लाख रुपये खर्च येणार आहे. या कक्षामध्ये या अभियंत्यांची ३ वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे, म्हणजेच १ कोटी ८० लाख रुपये वेतनापोटी देऊन पालिका या अभियंत्यांकडून कारकुनाचे काम करवून घेणार आहे. प्रशासनाच्या या अजब कारभाराबद्दल पालिका वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली असून या विरोधात एल्गार पुकारण्याच्या तयारीत मनसे आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा