झपाटय़ाने होत असलेल्या विकास आणि परराज्यांतील संस्कृतीची मुंबईच्या मातीत जुळू लागलेली नाळ यामुळे मुंबापुरीची मूळ संस्कृती आणि कला हळूहळू हरवू लागली असून संस्कृती आणि कलेच्या जोपासनेत मुंबई महापालिका अपयशी ठरली आहे. इतकेच नव्हे तर कलावंत आणि क्रीडापटूंना सेवेत सामावून घेण्यासाठी पालिकेच्या नोकरभरतीत आरक्षणही नाही. मुंबईकरांनी कररूपात दिलेल्या पैशांवर महापालिकेचा कारभार चालतो. पण मुंबईची संस्कृती आणि कलेचे संवर्धन मात्र पालिकेला करता आलेले नाही. त्यामुळे कला आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी स्वतंत्र खातेच सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईमध्ये झपाटय़ाने विकास होत आहे. त्यामध्ये चाळ संस्कृती लोप पावत असून नवीन टॉवर संस्कृती उदयास आली आहे. मुंबईत मोठय़ा संख्येने परराज्यातील नागरिकही दाखल झाले. मुंबईत बस्तान बसविल्यानंतर परराज्यवासीयांनी आपल्या मूळ संस्कृतीची मुंबईकरांना ओळख करून दिली. या परराज्यांतील संस्कृतीमध्ये मुंबईची मूळ संस्कृती मात्र हरवू लागली आहे. तशीच काहीशी गत मूळ मुंबईकरांच्या कलेची झाली आहे. परंतु त्याचे कोणत्याच राजकीय पक्षाला अथवा पालिका प्रशासनाला सोयरसुतक नाही.
केवळ मुंबईची संस्कृती आणि कलाच नव्हे तर कलावंत आणि क्रीडापटूंना प्रोत्साहन देण्यात महापालिका अपयशी ठरली आहे. शासनाच्या सेवेत सामावून कलावंत आणि क्रीडापटूंचा सन्मान केला जातो. परंतु तसा सन्मान मुंबई महापालिकेकडून केला जात नाही. मुळात पालिकेच्या नोकर भरतीमध्ये कलावंत आणि क्रीडापटूंसाठी आरक्षणच नाही. असे आरक्षण असते तरीही काही प्रमाणात महापालिकेकडून कलावंत आणि क्रीडापटूंना प्रोत्साहन मिळू शकले असते, अशी खंत नगरसेवकांकडून व्यक्त होत आहे.
महापौर निधीमधून गरीब रुग्णांना आर्थिक मदत दिली जाते. रुग्णांना सातत्याने मदत देण्यात येत असल्याने महापौर निधी सातत्याने आटत असतो. आटणाऱ्या निधीत मोठय़ा रकमेची भर पडावी यासाठी पूर्वी ‘महापौर रजनी’चे आयोजन केले जात असे. त्यानिमित्ताने का होईना पण महापालिकेच्या माध्यमातून मुंबईकरांना महाराष्ट्राच्या लोककलेचे दर्शनही घडत असे. परंतु गेल्या काही वर्षांत ‘महापौर रजनी’चे आयोजनच करण्यात आलेले नाही. आता तर महापौरांनाही ‘महापौर रजनी’चा विसर पडला आहे. केवळ उद्योगपती आणि समाजातील प्रतिष्ठितांकडे हात पसरून हा निधी वाढविण्याची सवयच महापालिकेला लागली आहे.
ही पाश्र्वभूमी बदलावी आणि मुंबईची संस्कृती व कलेची जोपासना व्हावी यासाठी सर्वसमावेशक, असे धोरण निश्चित करावे, त्याचबरोबर कला आणि संस्कृतीच्या जोपासनेसाठी स्वतंत्र कला आणि सांस्कृतिक खातेच महापालिकेत सुरू करावे, अशी मागणी नामनिर्देशित नगरसेवक अवकाश जाधव यांनी केली आहे. त्याचबरोबर उद्याने, मैदाने, मोकळ्या जागांवर कला आणि सांस्कृतिकविषयक आरक्षणही असावे. त्यामुळे संस्कृतीची जोपासना होईल आणि कलेलाही वाव मिळेल. तसेच मुंबईची वेगळी ओळखही जगापुढे राहील, असे अवकाश जाधव म्हणाले. नवे खाते सुरू करण्याची मागणी एकमताने मंजूर करून सभागृहाने पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्याकडे पाठविली आहे. आगामी वर्षांच्या अर्थसंकल्पात त्यासाठी तरतूद असावी असेही ते म्हणाले.
कला, संस्कृतीचा पालिकेला विसर!
झपाटय़ाने होत असलेल्या विकास आणि परराज्यांतील संस्कृतीची मुंबईच्या मातीत जुळू लागलेली नाळ यामुळे मुंबापुरीची मूळ संस्कृती ...
First published on: 31-01-2015 at 01:18 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bmc forge arts and culture