लोकसहभागातून राबविण्यात आलेली नानगदी स्वच्छता मोहीम, डेंग्यू व मलेरियाचे वाढते प्रमाण बघता शहरातील विविध भागात साफसफाई आणि विविध कल्याणकारी आणि विकासाच्या दृष्टीने लोकोपयोगी योजना राबविण्यासोबत त्यात लोकसहभाग, चोवीस तास पाणीपुरवठा योजनेला असलेला नागरिकांचा विरोध आणि त्याविरोधात विविध राजकीय पक्षांची, नगरसेवक आणि जनआंदोलन, महापालिकेत स्टार बसच्या विविध घोटाळ्यांवरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाने महापालिकेतील सरते वर्ष गाजले. महापालिकेला यावर्षी विविध योजनांसाठी सात ते आठ राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.  
महापालिकेत पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतर शहरातील नागरिकांच्या त्यांच्याकडून अनेक अपेक्षा वाढल्या असताना काही प्रमाणात त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला असला तरी शहरातील काही मूलभूत समस्या मात्र वर्षांच्या शेवटी कायम आहेत. दिलेल्या आश्वासनानुसार शहरातील विकास कामे जलदगतीने होऊन शहराचा चेहरामोहरा बदलेल असे वाटले होते, मात्र गेल्या वर्षभरात विकासाच्या नावाखाली लोकसहभागातून नागनदी स्वच्छता, वृक्षारोपण, प्लास्टर ऑफ पॅरिस गणपती मूर्ती विसर्जन, स्वच्छ नागपूर सुंदर नागपूर अंतर्गत स्वच्छता मोहीम आदी योजना राबविल्या. त्या योजनांना काही सामाजिक संघटनांसह नागरिक आणि शासकीय पातळीवर प्रतिसाद मिळाला, मात्र त्यात सातत्य राखण्यात महापालिका प्रशासन आणि पदाधिकारी कुठेतरी कमी पडले आहेत.
एकीकडे राज्य सरकारने उपराजधानीत एलबीटी लागू केल्यामुळे महापालिकेच्या झालेल्या कमकुवत आर्थिक स्थितीमुळे त्याचा विकास कामावर झालेला परिणाम, अतिवृष्टीमुळे शहरातील विविध भागातील रस्त्याची झालेली दयनीय अवस्था आणि सत्तापक्षाची विकासासाठी सुरू असलेली धडपड फारशी यशस्वी झाली नाही. सत्तापक्ष प्रामाणिकपणे योजना राबवित असले तरी प्रशासनाकडून त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. महापालिकेची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी सत्तापक्ष आणि प्रशासनातील अनेक अधिकारी प्रयत्न करीत असताना महापालिकेत विविध घोटाळे यावेळी गाजले. गेल्या वर्षभरात स्वच्छता मशीन, ऐवजदार भरती, बोगस नियुक्तीपत्र, स्टार बस, मालमत्ता आणि वाहतुकीतील भंगार घोटाळ्यासह घाटावरील लाकूड घोटाळा उघडकीस आला असताना त्यातील अनेक प्रकरणाची वर्षांअखेर चौकशी सुरू असून केवळ प्रशासन पातळीवर कागद सरकवण्याचे काम केले जात आहे, मात्र प्रत्यक्षात कारवाई केली जात नाही.
अतिवृष्टीमुळे शहरातील विविध भागातील रस्त्याची अवस्था फारच वाईट झाली आहे. ते दुरुस्त करण्यासाठी फारसे कुठलेच प्रयत्न दिसून येत नाही. ज्या भागात जावे त्या भागात आजही खड्डय़ाचे प्रमाण दिसून येते. विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या जामठा स्टेडियममध्ये कुठलीही आग प्रतिबंधक उपाययोजना नसल्यामुळे अग्निशामक विभागाने भारत आणि ऑस्ट्रेलिया सामन्याची परवानगी नाकारली होती, मात्र काही दिवसांनी अटींची पूर्तता केल्याने त्याला मान्यता दिली होती. या घटनेने अग्निशामक विभाग प्रथमच आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचला. स्थायी समितीच्या अध्यक्षपदी झालेली अविनाश ठाकरे यांची निवड, महापालिकेतील सर्व आजी माजी महापौरांचा सत्कार आणि नागपूर विकास आघाडीतून भारिप बहुजन महासंघाने घेतलेला निर्णय या प्रमुख घडामोडी होत्या. सरते वर्ष महापालिकेत भ्रष्टाचाराच्या मुद्याने गाजले. विरोधकासह सत्ता पक्षातील काही सदस्यांनी रोज नवनवीन आरोप केले. विरोधकांच्या आरोपाला सत्ताधाऱ्यांनी प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात हवे तसे त्यांना यश आले नाही. विशेष म्हणजे, मुद्यावरून सत्तापक्षातील धुसफूसही बाहेर आली. जलवाहिन्या टाकण्याच्या कामात झालेला गैरव्यवहार, स्टार बसच्या करारात झालेला कोटय़वधीचा घोटाळा, टीडीआर प्रकरण हे विषय सभागृहातही गाजले. वर्षांच्या अखेपर्यंत हा वाद कायम आहे. चोवीस तास पाणीपुरवठा योजनेचा गवगवा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असला तरी लोकांची मोठय़ा प्रमाणात नाराजी कायम आहे. मोठय़ा प्रमाणात पाण्याची देयके आल्याने जनतेत मोठी नाराजी निर्माण झाली. एकंदरीत एलबीटीमुळे महापालिकेची आर्थिक स्थिती  कमकुवत असली तरी महापालिकेच्या शतकोत्तर महोत्सवाच्या निमित्ताने नागरिकांना अनेक सत्तापक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाकडून अनेक अपेक्षा असून येणाऱ्या २०१४ या वर्षांत त्या पूर्ण करण्यासाठी महापालिकेच्या उपक्रमात आपण सहभागी होऊ  या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा