महापालिकेच्या डोंबिवली कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पी. पी. चेंबर्स मॉलच्या विकासकाने मॉलच्या इमारतीवर महापालिकेने घालून दिलेल्या अटीशर्तीचे उल्लंघन करून निवारा शेड उभारण्याचा प्रयत्न चालवला आहे. गेल्या तीन वर्षांपासून वारंवार नोटिसा देऊनही हा विकासक महापालिका अधिकाऱ्यांना दाद देत नाही. अखेर महापालिका अधिकाऱ्यांनी या विकासकाला अंतिम कारवाईची नोटीस बजावून, इमारतीवरील नियमबाह्य़ शेड तात्काळ तोडून टाकावी, अन्यथा ‘एमआरटीपी’चा गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा देणारी नोटीस बजावली आहे.
पी. पी. चेंबर्स मॉल महापालिकेच्या इमारतीपासून काही अंतरावर आहे. या मॉलचे ऊन, पावसापासून संरक्षण व्हावे म्हणून विकासक प्रफुल्ल मणिलाल शहा यांनी डिसेंबर २०११ मध्ये नगररचना विभागाकडून इमारतीवर पत्र्याची शेड टाकण्यासाठी परवानगी घेतली. ही परवानगी फक्त सहा महिन्यांसाठी मर्यादित होती. असे असताना गेल्या दोन महिन्यांपासून विकासकाने महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता शेडची उंची वाढवून ती भक्कम करण्याचे प्रयत्न चालवले आहेत. रात्रीच्या वेळेत तसेच महापालिकेला सुट्टी असेल त्यादिवशी विकासक शेड उभारण्याचे काम करीत असल्याचे ‘फ’ प्रभाग कर्मचाऱ्यांचे निदर्शनास आले. २९ एप्रिलपासून विकासक प्रफुल्ल शहा यांना महापालिकेने चार वेळा नोटिसा बजावून शेड काढण्याचे आदेश दिले.
यावेळी शहा यांनी आपण परवानगीचे नुतनीकरण करून घेतो, यापुढे काम करण्यात येणार नाही अशी जुजबी उत्तरे देऊन वेळकाढूपणा केला असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. इमारतीवरील लोखंडी भक्कम सांगाडा विकासक कोणत्याही क्षणी पक्का करून तो बंदिस्त करण्याची शक्यता असल्याने, फ प्रभागाने अंतिम कारवाईची नोटीस विकासक शहा यांना बजावली आहे. तातडीने शेड स्वत:हून तोडून टाकावी अन्यथा पालिकेकडून कारवाई करून सर्व खर्च तुमच्याकडून वसूल केला जाईल. तसेच एमआरटीपीचा गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा शहा यांना देण्यात आला आहे.