‘स्वच्छ भारत अभियाना’चा डंगा मुंबापुरीत वाजविला जात असताना गेली अनेक वर्षे भल्या पहाटे हातात खराटा घेऊन मुंबई लख्ख करणारा सफाई कामगार मात्र दुर्लक्षितच राहिला आहे. सतत कचऱ्याच्या सान्निध्यात राहिल्यामुळे पालिकेच्या सफाई कामगारांचे आयुर्मान कमी होत आहे. मुंबईच्या साफसफाईत पालिकेचे तब्बल २५ हजारांहून अधिक कामगार कार्यरत असतात. पण पालिकेच्या सेवानिवृत्तांच्या यादीमध्ये सफाई कामगारांची टक्केवारी हाताच्या बोटावर मोजता येईल एवढी आहे. यावरूनच मुंबईचा उकीरडा साफ करता करताच निवृत्तीपूर्वीच कामगार मृत्युमुखी पडत असल्याचे स्पष्ट होत आहे. पण त्यांच्या समस्यांकडे लक्ष द्यायला आजही पालिका प्रशासन अथवा राजकारण्यांना वेळ नाही.
कुलाब्यापासून दहिसर आणि मुलुंडपर्यंतचे सर्व रस्ते आणि गल्लीबोळ स्वच्छ करण्याचे काम पालिकेचा सफाई कामगार भल्या पहाटेपासून सुरू करतो. मात्र मुंबई स्वच्छ ठेवण्याचे काम करणारा हा कामगार कायम उपेक्षित राहिला आहे. राहायला मोडकळीस आलेले पालिकेचे गलिच्छ सेवा निवासस्थान अथवा बकाल वस्तीमधील झोपडी. कायम घाणीत काम करावे लागत असल्यामुळे जडलेले व्यसन, कचऱ्यामुळे निर्माण होणारे आरोग्याचे प्रश्न अशा अनेक समस्यांमुळे सफाई कामगारांचे जीवनमान कमी झाले आहे. सफाई कामगारांसाठी पालिकेने ठिकठिकाणी चौक्या उभारल्या. पण मुंबईकरांना शुद्ध पाणीपुरवठा करणाऱ्या पालिकेला सफाई कामगारांच्या अनेक चौक्यांमध्ये पुरेसे पिण्याचे आणि स्वच्छतेसाठी पाण्याचा पुरवठा करता आलेला नाही. गळके छप्पर, कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र खोलीचा अभाव, बदललेले कपडे आणि चिजवस्तू ठेवण्यासाठी लॉकर नाहीत, हातमोजे, पुरेशा झाडू, मास्कचा अपुरा पुरवठा, स्वच्छतेच्या साधनांचा अभाव, अशा परिस्थितीत पालिकेचा सफाई कामगार काम करीत आहे. बहुसंख्य सफाई कामगार असाध्य आजारांमुळे निवृत्तीपूर्वीच मृत्युमुखी पडत आहेत. परिणामी त्यांच्या कुटुंबाचीही फरफट होत आहे.
अस्वच्छतेमुळे मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात येऊ नये यासाठी पालिकेचा सफाई कामगार नित्यनियमाने साफसफाईचे काम करीत आहे. पण अनेक सेवा-सुविधांपासून तो आजही वंचित आहे. क्षयरोगाला बळी पडणाऱ्यांमध्ये सफाई कामगारांची संख्या अधिक आहेत. या कामगारांचे जीवनमान उंचावे, त्यांचे आरोग्य चांगले राहावे, त्यांच्या निवाऱ्याची उत्तम व्यवस्था व्हावी, त्यांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी प्रशासनाकडून ठोस पावले उचलण्यात येत नाहीत. पण तरीही ही मंडळी कचरा उपसण्याचे काम अखंडपणे करीत असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘स्वच्छ भारत अभियान’ यशस्वी करण्यासाठी पालिका आयुक्तांनी विडा उचलला आहे. पण मुंबई लख्खकरणारा सफाई कामगारच पालिकेचा खरा अॅम्बॅसेडर असून तशी घोषणा आयुक्तांनी केल्यास हे अभियान यशस्वी होईल आणि कामगाराचाही सन्मान होईल.
दिलीप नाईक, अध्यक्ष – महाराष्ट्र नवनिर्माण कामगार कर्मचारी सेना